Breaking

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२

चिबड जमिनीचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्यावी...आ. बबनदादा शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे



चिबड जमिनीचे तातडीने पंचनामे करुन  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्यावी...आ. बबनदादा शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे


बेंबळे।प्रतिनिधी।                           
                    अतिवृष्टीमुळे माढा तालुक्यातील 40 ते 50 गावातील जमिनीला पाणी लागले आहे, त्या जमिनी 'चिबड' झाल्या आहेत व त्यातील खरीप हंगामातील हातात तोंडाशी आलेली पिके व अनेक ठिकाणच्या शेतामध्ये रब्बी पेरणीची नुकतीच उगवण झालेली पिके नष्ट झालेली आहेत, या सर्व पाणी लागलेल्या चिबड जमिनीचे शासनाने तातडीने पंचनामे करावेत व संबंधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,व कृषी मंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे, या निवेदनाच्या प्रति मेल द्वारे पाठवण्यात आलेल्या आहेत.
                  वृत्तांत असा की मागील दहा-बारा दिवसापासून पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे माढा तालुक्यात निमगाव टे, कुर्डू ,भोसरे परिसरात तर ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन गेला ,त्यामुळे शेती, रस्ते, उभी पिके यांचे अतोनात नुकसान झाले, जमिनी उखडून वाहून गेल्या व त्याचप्रमाणे दररोज नियमित पावसाने हजेरी लावल्यामुळे माढा मोडनिंब उपळाई बुद्रुक बावी भेंड तुळशी घोटी या प्रमुख गावांच्या परिसरातील अनेक भागात जमिनीतून पाणी वाहू लागले आहे, जमिनीला पाणी लागले आहे व या जमिनीला अती पाण्यामुळे चिबड लागले आहे ,अशा जमिनीत हातातोडाशी आलेली खरीप पिके व तसेच बऱ्याच ठिकाणी रब्बी ज्वारी करडई मका या नुकत्याच उगवण झालेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, ही पिके वाहून गेली आहेत तर अति पाण्यामुळे सर्व ठिकाणी नासून गेली आहेत. या चीबड झालेल्या जमिनीत किमान दोन ते अडीच महिने वापसा येणार नाही व तोपर्यंत सर्वत्र गवत व तण उगवून शेतकऱ्यांना कोणतेही पीक घेता येणार नाही, योग्य प्रकारे जमिनी तयार होऊन त्या कसण्यासाठी व पुन्हा पिके घेण्यासाठी किमान आठ ते दहा महिने लागणार आहेत हे निश्चित व या सर्व कारणामुळे शेतकरी सध्या खचून गेला आहे, हवालदील झाला आहे, निराश झाला आहे. 'पाऊस जगू देईना शासन लक्ष देइना' अशी अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे, व या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे आपल्या कुटुंबीयांचे पालन पोषण कसे करायचे या विवंचनेने शेतकरी  चिंतित झाला आहे. तरी तहसीलदार, कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी आपली सर्व यंत्रणा युद्ध पातळीवर कामाला लावून चिबड जमिनीचे तातडीने पंचनामे करून  दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी तरच त्यांची दिवाळी गोड होईल अन्यथा नाही, अशी वस्तुस्थिती आमदार बबनदादा शिंदे यांनी शासनाला दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केली आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा