करमाळा नगरपालिकेच्या असुविधेने त्रस्त नागरिक, "जवाब दो" या आंदोलनाच्या तयारीत....
करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना योग्य सोयीसुविधा मिळणे गरजेचे आहे. परंतू नागरिकांकडून नको तो कर आकारण्यात येतो. ज्या सुविधा पुर्णपणे नगरपालिका पुरवू शकत नाही. तो कर नागरिकांनी न भरल्यास त्यावर नगरपालिकेच्या वतीने व्याज देखील आकारले जाते. अशा एक ना अनेक कारणांसाठी करमाळा नगरपालिकेच्या बागल गटाच्या मा. नगरसेविका सौ. सविता जयकुमार कांबळे यांनी नगरपालिकेच्या भोंगळ कारभार विरोधात आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.
यावेळी पुढे बोलताना सौ. कांबळे म्हणाल्या कि, येत्या काही दिवसात आषाढी एकादशी असल्यामुळे, करमाळा शहरातुन मोठ्या प्रमाणात, विविध भागातील आलेले वारकरी पायी वारी करताना दिसुन येतात. परंतू नगरपालिकेला या सर्व बाबींचे कोणते ही सोयरसुतक नसल्याचे पहायला मिळते. त्याचप्रमाणे नगरपालिकेने सिध्दार्थनगर येथे नागरीकांना गटारीची, पिण्याच्या पाण्याची तसेच वीजेची योग्य सोय करावी. येथील नागरिकांना अस्वच्छ पाणी पुरवठ्यामुळे आरोग्याची समस्या जाणवू लागली आहे. त्याचप्रमाणे येथील भागात पाणी पुरवठ्याचे पाईप सुद्धा दुरुस्त करणे गरजेचे आहे. सिध्दार्थनगर व सुमंतनगरच्या दान्ही बाजूला नाले असल्याने पावसाळ्याच्या दिवसात नालेची सफाई वेळेवर करण्यात यावी. जर नाले सफाई केली तर नाल्यातील घाण रस्त्यावरच टाकली जाते. त्यामुळे तेथे राहणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. केत्तूर नाका ते रावगाव नाका रस्त्याची अवस्था बिकट झालेली आहे. तेथून वाहने चालविणे कठीण झाले आहे. त्याचप्रमाणे याच मार्गाने श्री संत निवृत्तीनाथ महाराज याची हजारो वारकऱ्यांची मोठी पायी पालखी पंढरीकडे जात असते. त्यामुळे या वारकऱ्यांना देखील केत्तूर नाका ते नागोबा मंदिराच्या मार्गावर चालताना मोठी कसरत करावी लागते. त्याचप्रमाणे दलित स्मशानभूमीत एखाद्या मयत व्यक्तीला घेऊन जात असताना, स्मशानभूमीच्या मार्गावर अत्यंत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे करमाळा नगरपालिकेने वरील सर्वच समस्यांवर वेळीच उपाययोजना कराव्यात.
आदी विविध मागण्यांची पूर्तता, करमाळा नगरपालिकेने येत्या आषाढी एकादशीच्या आत पुर्ण करावी. अन्यथा शहरातील पिडीत नागरिकांना सोबत घेऊन करमाळा मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून "जवाब दो" आंदोलन केले जाईल. अशा प्रकारचा इशारा करमाळा नगरपालिकेच्या बागल गटाच्या मा. नगरसेविका सौ. सविता जयकुमार कांबळे यांनी दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा