परिते येथील भारत बाबर यांना प्रति एकरी 120 मेट्रिक टन उसाचे उत्पादन .....
बेंबळे। प्रतिनिधी। मुकुंद रामदासी AJ 24Taas News Network Network
परिते तालुका माढा येथील बागायतदार भारत कोंडीबा बाबर यांनी प्रति एकरी 120 टन उसाचे उत्पादन घेतले असून त्यांच्या सव्वा एकरात 151 टन ऊस निघाला आहे. भारत बाबर यांनी सांगितले की मार्च 21 मध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने पहिली नांगरट केली,नंतर जूनमध्ये दुसरी नांगरट करून फन-पाळी केली व जुलैमध्ये पाच फूट रुंदीची सरी सोडली व रासायनिक खताचा बेसल डोस टाकल्यानंतर 25 जुलै 21 रोजी सरीमध्ये दोन डोळ्याची दीड फुटाचे अंतर सोडून, प्रक्रिया केलेल्या कोसी-265 वाणाच्या ऊस देण्याची लागण केली. 25 दिवसांनी ड्रीप मधून युरिया सोडला, ऊस संजीवनी चे कृषिरत्न संजीव माने व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी नारायण लगड यांचे मार्गदर्शनानुसार, ऊस लहान होता तोपर्यंत पाठीवरील पंपाने चार फवारण्या केल्या तसेच 60 दिवसानंतर तज्ञाच्या मार्गदर्शनानुसार युरिया, फेरस, झिंक , कॉपर सल्फेट, बोरॉन, मॅग्नेशियम ही खते पहारीच्या साह्याने भोके पाडून उसाच्या मुळापर्यंत सोडली. 100 दिवसानंतर पॉवर ट्रेलरच्या साह्याने उसाची पक्की बांधणी केली व त्यानंतर 12ः 61 व 0:0: 50 ही खते ड्रीप मधून सोडली व नंतर जिवाणू खत सोडले. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक पंधरा दिवसाला ऊसाला शेण, गोमूत्र ,बेसन पीठ, गुळ व काळी माती यांचे मिश्रण( स्लरी )सोडले, ऊस मोठा झाल्यावर ड्रोनच्या साह्याने फवारणी केली. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे ॲग्री ओव्हरसीयर चिंतामणी व चीटबॉल जाधव यांनी प्रोग्रॅम प्रमाणे ऊस तोडणी केली. बाबर यांना या सव्वा एकरात 150. 982 मेट्रिक टन उसाचे ,म्हणजे सरासरी एकरी 120 टन उसाचे उत्पन्न मिळाले आहे , बाबर यांचा या ऊस पीकासाठी एकूण 80 हजार रुपये खर्च झाला आहे.
विठ्ठलराव शिंदे कारखान्याने जाहीर केल्याप्रमाणे पहिले बिल 2350 रुपये प्रति टन यानुसार 3 लाख 52 हजार पाचशे रुपये बाबर यांच्या खात्यावर दहा दिवसात जमा होणार आहे.
याबद्दल भारत बाबर यांचे कारखान्याचे चेअरमन आमदार बबनदादा शिंदे जनरल मॅनेजर सुहास यादव मॅनेजिंग डायरेक्टर संतोष डिग्रजे, केन मॅनेजर संभाजी थिटे, शेतकी अधिकारी सुनील बंडगर व अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. भारत बाबर यांचा ऊस उत्पादनाचा आदर्श सर्व शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरेल हे निश्चित.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा