Breaking

बुधवार, २५ मे, २०२२

मढेवडगाव सेवा सोसायटी, जिल्हा बँकेने पशुखाद्य व पीककर्ज रोखल्याने खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची तारांबळ: कर्जवाटप न केल्यास ३१ मे रोजी सभासदांचे उपोषण.



मढेवडगाव सेवा सोसायटी, जिल्हा बँकेने पशुखाद्य व पीककर्ज रोखल्याने खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची तारांबळ: कर्जवाटप न केल्यास ३१ मे रोजी सभासदांचे उपोषण.



श्रीगोंदा-नितीन रोही,

 दि.२५: श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी व जिल्हा बँकेच्या मढेवडगाव शाखेचा अजब कारभार सुरू असल्याने ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर सभासद शेतकऱ्यांना कर्ज मागण्यास गेले असता उडवाउडवीची उत्तरे देऊन कर्ज देण्यापासून जाणूनबुजून रोखले जात आहे. येत्या पाच दिवसात कर्ज वाटप न केल्यास मंगळवार दि. ३१ मे रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्याचा इशारा सभासद शेतकरी व पंचायत समिती सदस्य जिजाबापू शिंदे व अंबादास मांडे यांनी तहसीलदार मिलिंद कुलथे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
       मढेवडगाव सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून दि.१८ जून रोजी मतदान आहे. परंतु सत्ताधाऱ्यांनी अंतर्गत राजकारणाला सुरुवात करून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर विरोधक सभासदांना कर्जवाटपापासून वंचित ठेवण्यात येत असल्याने कर्जदार सभासद पंचायत समिती सदस्य जिजाबापू शिंदे व अंबादास मांडे यांनी निवेदनात म्हटले आहे की ३१ मार्च पूर्वी ३१० सभासदांनी विहित वेळेत कर्जाची परतफेड केली आहे व जिल्हा बँकेने कर्जफेड केल्यावर तात्काळ कर्ज देण्याचे आश्वासन दिले होते परंतु सेवा सोसायटीने जिल्हा बँकेच्या आदेशाला हरताळ फासून मर्जीतील ३५ सभासदांना कर्जवाटप व एकाच कुटुंबातील   पाच पाच व्यक्तींना कर्जवाटप करून बाकी नियमात बसणाऱ्या ३१० सभासदांना उडवाउडवीची उत्तरे देऊन कर्जापासून वंचित ठेवण्याचा अजब प्रकार चालू आहे. निवेदनात शिंदे व मांडे यांनी म्हटले आहे की खरिपाचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना बी बियाणे, खते, औषधे व शेतीच्या मशागतीसाठी पैशाची अत्यंत गरज आहे. पण सोसायटीच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांना शेती पडीक ठेवावी लागेल. येत्या पाच दिवसांत कर्ज मिळाले नाही तर मंगळवार दि.५ रोजी सर्व सभासदांना बरोबर घेत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

चौकट: सेवा संस्थेत सर्व प्रकारच्या कर्जासाठी १०६५ सभासद पात्र आहेत. केंद्र सरकारच्या योजनेत ६% अल्पव्याजाने पशुखाद्य कर्जासाठी ४५० पात्र सभासदांनी मार्चअखेर कर्ज फेडले आहे. त्यातील राजकीय उद्देशाने फक्त १०० सभासदांना कर्ज वाटप केले आहे तर विरोधक ३१० सभासदांना कर्जापासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरू आहे. सेवा संस्थेने काही मर्जीतील कुटुंबातील ३५ जणांना एकाच दिवशी ३० एप्रिल रोजी १५ लाख ७५ हजारांचे पशुखाद्य कर्ज वाटप करण्याचा विक्रम सोसायटीने केला आहे. या ३५ कर्जदारात अनेकांकडे साधे शेळी सारखे जनावरही नसल्याने वाटलेल्या कर्जाबाबत शंका-कुशंका निर्माण होत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा