*मराठा सेवा संघाने बहुजनांना सांस्कृतिक गुलामगिरीतून मुक्त केले - डॉ बाबुराव लावंड*
*करमाळा तालुका प्रतिनिधी - अतुल वारे पाटील*
मराठा सेवा संघाने बहुजन समाजाला सांस्कृतिक गुलामगिरीतून मुक्त करून मान, मेंदू,मन व मणका सशक्त करण्याचे काम केले . मराठा सेवा संघाचे काम मराठा बहुजांच्या सांस्कृतिक प्रवासात मैलाचा दगड ठरेल असे गौरवोद्गार प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ बाबुराव लावंड यांनी व्यक्त केले.
मराठा सेवा संघाच्या 31 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती चौक येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी डॉ पोपट नेटके, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील, सचिव सचिन आबा शिंदे, डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद जिल्हा सचिव सतीश वीर, तालुकाध्यक्ष अजित कणसे, सचिव संतोष शितोळे, अंकुश सुरवसे, संभाजी ब्रिगेड तालुका कार्यध्यक्ष राजेश ननवरे, समाधान नरसाळे, उदयनराजे वारे पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, मराठा सेवा संघाने 33 कक्षाच्या माध्यमातून समाजात जातीय सलोखा राखण्याचा प्रयत्न केला. वर्षानुवर्षाच्या सांस्कृतिक गुलामगिरीतून बहुजनांना मुक्त करून विज्ञानवादी, परिवर्तनवादी विचारधारा रुजवण्याचा प्रयत्न केला. याचाच परिणाम म्हणून आज जातीय दंगली होण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे सतिश वीर यांनी मराठा सेवा संघाच्या 31 वर्षांच्या कारकिर्दीचा आलेख उपस्थितांसमोर मांडला. यावेळी ते म्हणाले की,पॉलिशपासून मालिशपर्यंत कोणताही व्यवसाय करून जीवनात यशस्वी होण्याचा मूलमंत्र ऍड पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मराठा बहुजन समाजाला दिल्यामुळे आज उद्योग क्षेत्रात प्रचंड प्रमाणात युवक पुढे आले. मराठा सेवा संघाने युवकांना आधुनिक विचार दिल्याने एमपीएससी यूपीएससी मध्ये तसेच विविध मानांकित पदांवर बहुजन समाज कार्यरत आहे.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील म्हणाले की, अर्थसत्ता- राजसत्ता- धर्मसत्ता-शिक्षण सत्ता व प्रचार प्रसार माध्यम सत्ता काबीज करण्यासाठी मराठा सेवा संघ यापुढेही कार्यरत राहणार असून महापुरुषांच्या विचारधारेवर चालून त्यांच्या स्वप्नातील समाज निर्मितीसाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा