Breaking

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१

ई - पीक पाहणी ने वाढवली शेतकऱ्यांची डोकेदुखी पीक पाहणी अपलोड करताना करावी लागतेय अनेक समस्या वर मात



ई -  पीक पाहणी ने वाढवली शेतकऱ्यांची डोकेदुखी 

पीक पाहणी अपलोड करताना करावी लागतेय अनेक समस्या वर मात 
 परंडा  (दत्ता नरुटे):-  महापुराने  झालेली दलदल, पाऊस, ॲप लवकर ओपन होत नसल्याने राज्य सरकारची 'ई-पीक' पाहणी म्हणजे शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप झाला आहे  तांत्रिक अडचणीमुळे एकीकडे शेतकरी हैराण असताना सरकारने मात्र ते लवकर पूर्ण करण्याचा तगादा लावल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.परंडा तालुक्यात ६ सप्टेंबरपर्यंत केवळ 10 हजार शेतकऱ्यांनीच ही माहिती भरली आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीमध्ये काय पीक केले, त्यासाठी पाण्याची काय व्यवस्था आहे याबाबत वर्षाला माहिती जमा केली जाते. आतापर्यंत तलाठी संबंधित शेतकऱ्याला कार्यालयात बोलावून माहिती घेत होते. मात्र, राज्य सरकारने 'ई-पीक'च्या माध्यमातून ही माहिती शेतकऱ्यांनीच भरून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही शेतकऱ्यांनी संबंधित गट नंबरमध्ये जाऊन मोबाईल ॲपव्दारे ही माहिती भरायची आहे. आपला देश किती तंत्रज्ञानाच्या पातळीवर प्रगत झाल्याच्या आपण गप्पा मारत असलो तरी अजूनही शेतकरी या ज्ञानापासून चार हात लांबच आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे ॲन्ड्राईड मोबाईल नाहीत. त्यामुळे ही माहिती भरायची कशी या पेचात शेतकरी आहे. त्यातच महापुरामुळे अजूनही नदीकाठच्या शिवारात दलदल आहे, त्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने नद्यांचे पाणी पुन्हा पात्राबाहेर पडल्याने शिवारात जाऊन माहिती भरताना अग्निदिव्य पार पाडावे लागत आहेत. त्यातही अनेक तांत्रिक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. १५ सप्टेंबरपर्यंतची सरकारने मुदत दिली आहे. विहीत वेळेत केले नाहीतर पीक विम्यासह इतर सुविधा दिल्या जाणार नसल्याचा फतवा सरकारने काढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

वाड्यावस्त्यांवर वीज नाही तर मोबाईल चार्ज करणार कुठे 

 तालुक्यातील अनेक भागात वादळी पाऊस झाल्याने विजेचे पोल उन्मळून पडले आहेत अश्या ठिकाणी वीज पुरवठा खंडित आहे त्यामुळे  मोबाईल चार्ज कुठं करायचा हा यक्षप्रश्न त्याच्या समोर उभा आहे मग  तो   शेतकरी माहिती भरणार कशी?  अनेक ठिकाणी रेंज चा अडथळा येत आहे असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत.तर अनेकांना इ पीक पाहणी म्हणजे काय तेच माहिती नाही त्यामुळे डोकेदुखी वाढली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा