*माधवस्मृती हॉस्पिटल, कुर्डुवाडी* *व सोलापूर जिल्ह्याचे सुप्रसिद्ध डॉ.अशोक वागळे यांचे दुःखद निधन*
कुर्डुवाडी व पंचक्रोशीच्या वैद्यकीय इतिहासातील एक सुवर्णयुग म्हणून त्यांच्या सेवेचा ठसा होता
आज आपण हॉस्पिटल ला जायचे म्हटले की पहिल्यांदा आर्थिक बाबींचा विचार मनात येतो पण माफक दरात खूप दुर्गम आजारावर उपचार करणारे डॉ वागळे सर्वांना देवासारखे वाटायचे.
डॉ.अशोक विनायकराव वागळें ह्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९३६ रोजी पुण्याच्या ससून हॉस्पिटल मध्ये झाला. वागळे कुटुंब गौड सारस्वत यह ब्राम्हण, मूळचे कारवारचे, डॉक्टरांचे वडील, डॉ.विनायकराव वागळे त्या काळातले जनरल सर्जन, ससून हॉस्पिटल मध्ये जनरल सर्जन आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. डॉ.अशोक सरांचेचे शालेय शिक्षण पुण्याला येरवडा येथे, कर्नाटकात होनावर आणि कारवार येथे झाले.एस एस एसी नंतर इंटर सायन्स पर्यंत, मुंबईत,सेंट झेवियर्स कॉलेज व वैद्यकीय शिक्षण जी एस मेडिकल कॉलेज आणि के ई एम हॉस्पिटल मध्ये झाले. १९५९ साली त्यांनी एम बी बी एस ची वैद्यकीय पदवी मिळवली. तर, १९६४ साली एम एस जनरल मेडिसिन हि पोस्ट ग्रॅज्युएट पदवी मिळवली. दरम्यान त्यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये डॉक्टर अर्नेस्ट बोर्जिस ह्या जगत विख्यात ऑन्को सर्जन समवेत काम केले आणि कॅन्सर सर्जरीजचा बहुमोल अनुभव मिळवला.त्याच प्रमाणे केईएम मध्ये निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत असतांना डॉ. तळवलकरांना आणि डॉ. आर्थर डी सा ह्या दिग्गजां समवेत काम करण्याची संधी मिळाली.केईएम मध्ये ऑर्थोपेडिक्स, गॅस्ट्रो इंट्रोलॉजी डिपार्टमेंट मध्ये काम केल्यामुळे आणि दिवसाला शेकडो पेशंट्स हाताळायला मिळाल्याने गाठीशी पुढील आयुष्यात कामी येईल असा प्रचंड अनुभव मिळाला.
डॉ.वसंत गणेश देसाई हे डॉ. अशोक वागळे यांचे सख्खे मामा. मामा-मामींना स्वतःचे अपत्य नसल्याने डॉ.वागळेंवर त्यांची भरपूर माया! डॉ. देसाई बार्शी लाईट रेल्वे मध्ये कार्यरत होते. नोकरी निमित्त कुर्डुवाडीला राहायचे. त्या काळात कुर्डुवाडी हे मागासलेले दुष्काळी प्रदेशात वसलेले साधारण १५००० लोकवस्तीचे गाव, वैद्यकीय सेवेचा अभाव, त्यामुळे डॉ देसाईंनी १९५४ साली, रेल्वेतली कायम स्वरूपाची भरपूर पगाराची नोकरी सोडली आणि कुर्डुवाडीत "माधव स्मृती" हॉस्पिटल सुरु केले.
डॉ.अशोक यांनी १९६४ साली एम एस जनरल हि पदवी मिळवली. खरंतर डॉक्टरांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी चालून आली होती. पण त्यांच्या मामांनी, डॉ. देसाईंनी आपल्या भाच्याचे अभिनंदन करण्यासाठी पत्र पाठवले.आणि तुझे आता शिक्षण पूर्ण झाले आहे, तू आता गोरगरिबांच्या सेवेसाठी कुर्डुवाडीस येऊन स्थायिक व्हावेस आणि तुझ्या ज्ञानांचा आणी अनुभवाचा गोरगरिबांना फायदा करून द्यावास, असे नुसते सुचवले नाही तर चक्क गळ घातली. येथे नमूद करणे जरुरीचे आहे कि मुंबईत जी.एस. मेडिकल मध्ये शिक्षण झालेल्या आणि टाटा आणि केईएम मध्ये त्यावेळेच्या नामांकित डॉक्टरां बरोबर काम केलेल्या डॉक्टरने वैद्यकीय व्यवसायात प्रचंड स्कोप असलेल्या मुंबईत प्रॅक्टिस करण्याचे सोडून कुर्डुवाडी सारख्या मागासलेल्या आणि मूलभूत सुविधांचा म्हणजे वीज आणि पाण्याचा अभाव असलेल्या दुष्काळी व दुर्गम भागात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचा नुसता विचार करायचा हीच मुळी खूप मोठी गोष्ट होती, पण डॉ अशोकरावांनी आपल्या मामाच्या विनंतीला मान देऊन,मुंबई शहरातील सर्व प्रलोभने बाजूला सारून,आपल्या सर्व इच्छा ,मौज मजेला तिलांजली देऊन एक जानेवारी १९६५ पासून कुर्डुवाडी येथील आपल्या मामांचे माधवस्मृती हॉस्पिटलमध्ये रूजू झाले.
"वैद्यकीय सेवा हा आपला परमोधर्म आहे" हे मानणाऱ्या ध्येयवेड्या आणि गरिबांसाठी तळमळ असलेल्या हुशार आणि दिवसाला अठरा तास मेहनत करायची तयारी असलेल्या डॉ वागळे यांनी हा चॅलेंज स्वीकारला. सुरुवातीला खुप अडचणी आल्या .अचूक निदान आणि स्वस्तात स्वस्त उपचार ह्या जरी डॉक्टरांच्या जमेच्या बाजू असल्या तरी अत्याधुनिक उपकरणा अभावी आणि कुशल पॅरामेडिकल स्टाफ अभावी रुग्णांना योग्य उपचार देण्यासाठी खूप अडचणींना तोंड द्यावे लागत होते. तरीही डॉक्टरांनी जिद्दीने आणि कष्टाने असेल त्या सामुग्रीच्या साहाय्याने हसत खेळत अविरत रुग्णसेवा सुरु ठेवली, हळूहळू डॉक्टरांच्या सेवेमुळे पंचक्रोशीतील जनतेचा डॉक्टरांवर प्रचंड विश्वास बसू लागला. त्यांच्या पेशंटसाठी ते देवच वाटू लागले. पेशंट्सची प्रचंड श्रद्धा आणि विश्वास त्यांनी मिळवला. कुर्डुवाडीतील रुग्णां बरोबरच, दोनशे किलोमीटर परिसरातील म्हणजे सोलापूर ग्रामीण,मराठवाडा ग्रामीण आणि पुणे ग्रामीण भागातील रुग्ण माधव स्मृती हॉस्पिटल मध्ये गर्दी करू लागले. हॉस्पिटलचा व्याप प्रचंड प्रमाणात वाढू लागला. डॉक्टरांनी जमेल तसे आणि जमेल तेव्हा हॉस्पिटलच्या उपकरणात आणि इतर पॅरा मेडिकल सेवेत वाढ करण्यास सुरुवात केली.स्वतःची लॅब, स्वतःचे एक्सरे मशीन तर खरीदलेच, पण पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी डिपार्मेंट अद्ययावत करण्यासाठी प्रशिक्षित स्टाफ ची नियुक्ती करून त्यांना यथार्थ प्रोत्साहन दिले. येथे आणखी एका गोष्टीचा उल्लेख करणे गरजेचे आहे भारतात कॉम्पुटर युग येण्यापूर्वी म्हणजे १९८५ पूर्वी माधव स्मृती हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटचा अद्ययावत रेकॉर्ड मेंटेन करण्याची सिस्टीम डॉक्टरांनी अमलात आणली होती. शहरात शिकून आलेल्या होतकरू डॉक्टरांची नियुक्ती करून त्यांना रुग्णसेवेकरीता डॉ. वागळे यांनी स्वतःच्या देखरेखी खाली घडवले. डॉक्टरांनी १९८५ च्या सुमारास हॉस्पिटलची नवी इमारत उभी करून १०० बेडेड हॉस्पिटल कार्यरत केले. अल्ट्रा सोनोग्राफीची सोय हॉस्पिटल मध्येच सुरु झाली. सर्व फॅकल्टीज मधील तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांच्या सेवेला बाहेरून आल्याने त्यांच्या राहण्याची सोय करणे गरजेचे होते. त्यामुळे स्वतःसाठी आणि इतर डॉक्टरांसाठी अपार्टमेंट्स असलेली इमारत उभी केली. जेष्ठ नागरिकांच्या सेवे करिता वृद्धाश्रम उभारले. डॉ. वागळेंचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे "माधवस्मृती हॉस्पिटल" च्या उत्पन्नातून मिळालेल्या पै न पै वर आयकर भरत असल्याने सोलापूर जिल्हातील अग्रगण्य आयकर भरणाऱ्यांमध्ये ते नेहमीच अग्रगण्य असत. २००२ साली पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलच्या ट्रस्टींशी डॉक्टरांनी बोलणी केली आणि आणखी तीन वर्ष न्यू मॅनेजमेंट बरोबर काम करून चार्ज हॅण्डओव्हर करण्याचा करार सह्याद्री हॉस्पिटलशी केला, आणि २००५ साली चाळीस वर्षांची अविरत वैद्यकीय सेवा देऊन कुर्डुवाडीकरांचा निरोप घेतला. कुर्डुवाडीकरांनी आणि हॉस्पिटलच्या कर्मचारी वर्गाने डॉक्टरांना आणि त्यांच्या पत्नीला साश्रू नायनाने निरोप दिला.
अशा देवमाणसाचे , डॉ अशोक वागळे सरांचे , आज निधन झाले त्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे...
यावेळी डॉक्टर्स असोसिएशन टेंभुर्णीचे पदाधिकारी डॉ सतिश वाघावकर, डॉ विनायकराव गंभिरे, डॉ अमोल भोसले, डॉ सचिन खटके, डॉ पांडुरंग गायकवाड, डॉ.लालासाहेब शेंडगे डॉ. सचिन ढवळे , आदी सर्व डॉक्टरांनी कोरोना महामारीमुळे एकत्र न येता आपापल्या हॉस्पीटलमध्ये आज सकाळी ११वाजता दोन मिनिटे स्तब्ध राहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
...!!!! भावपूर्ण श्रद्धांजली।।।।
डॉक्टर अशोक वागळे म्हणजे सर्वसामान्य गोरगरिबांचे। " देवदूत"
आमदार बबनदादा शिंदे
डॉक्टर अशोक वागळे यांच्या निधनाचे वृत्त समजले आणि प्रचंड धक्का बसला. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये एम एस पर्यंत शिक्षण झालेले डॉक्टर अशोक वागळे यांनी कुर्डूवाडी सारख्या ग्रामीण भागात आपल्या आरोग्य सेवेच्या ज्ञानाचे मोठे योगदान देऊन असंख्य गोरगरीब, ग्रामीण जनतेला एक वरदान ठरले. कुर्डूवाडी सारख्या ग्रामीण ठिकाणी आपल्या मेडिकल ज्ञानाच्या जोरावर, सामान्यातल्या सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून हजारो गोरगरीब जनतेला जीवदान मिळवून दिले. त्यामुळे डॉक्टर अशोक वागळे हे या पंचक्रोशीत एक देवदूत म्हणूनच प्रसिद्ध होते .आज ही कुर्डूवाडी शहरातील वागळे हॉस्पिटल बस स्टॉप त्यांच्या नावाने अमर झालेला दिसून येतो. कुर्डूवाडी सारख्या शहरात डॉक्टर अशोक वागळे यांचे सारखेच सेवाभावी वृत्तीचे डॉक्टर तयार झाले तर आम्ही आमच्या परीने सर्वतोपरी सहकार्य करू, आणि असे झाले तरच डॉक्टर अशोक वागळे यांना कुर्डुवाडी व आसपासच्या परिसरातील नागरिकांची खरी श्रद्धांजली, आदरांजली ठरेल व त्यांची आठवण कायम प्रत्येकाच्या स्मरणात राहील।।।।। आमदार बबनराव शिंदे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा