*अखेर पडळचे कोविड केअर सेंटर सुरू*
*आण्णा व दादा यांच्या हस्ते शुभारंभ*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
खटाव तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असून पडळ ता. खटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुसज्ज इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी जि.प.सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी दिलेल्या उपोषणाच्या इशाराने गत ८- १० दिवसापासून चर्चेत असलेले शासकीय कोविड केअर सेंटर अखेर पडळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीत सुरू झाले. जि.प. उपाध्यक्ष प्रदिप विधाते (आण्णा) व जि.प. सदस्य सुरेंद्र गुदगे (दादा) यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी जि.प. समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, खटाव पंचायत समितीच्या सभापती जयश्री कदम, माजी सभापती संदिप मांडवे, मार्केट कमिटीचे माजी सभापती रविंद्र सानप, सरपंच मनिषा सानप, प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसिलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.युनुस शेख, डॉ.तुरुकमाने व मोजकेच ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी जि.प.चे उपाध्यक्ष श्री.विधाते म्हणाले, राज्यात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून ग्रामीण भागातही शेकडो रुग्ण आढळू लागले आहेत. जेथे गरज आहे तेथे कोविड केअर सेंटर उभे केले जाईल. सुरेंद्र गुदगे म्हणाले, सुमारे ७० बेडची क्षमता असलेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये सध्या २० बेड सुरु करण्यात आले आहेत. लवकरच या ठिकाणी ऑक्सिजनयुक्त ३० बेड सुरू केले जाणार आहेत.
दरम्यान पडळ येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाची चार दिवसापूर्वी तातडीची बैठक झाली. जिल्हाधिकारी, एसपी, सीओच्या बैठकीत श्री.गुदगे यांनी पडळ कोविड केअर सेंटर सुरु करण्याबाबत प्रशासन चालढकल करीत आहे असे सांगितले. तेव्हा सीओनी चार दिवसात कोविड केअर सेंटर सुरू करतो असे सांगितले. यावेळी पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील म्हणाले, आपण नुसतेच चार दिवस म्हणतो पण प्रत्यक्षात ८-१० दिवस जातात. सध्या कोविड रुग्ण संख्या वाढत चाललेली आहे. रुग्णांचे हाल होत आहेत. मला चार दिवसातच सेंटर सुरू झालेले दिसले पाहीजे. ना. पाटीलांच्या या संवेदनशीलतेमुळे पडळचे कोविड केअर सेंटर चार दिवसात सुरू झाले, असे गुदगे म्हणाले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा