Breaking

गुरुवार, १८ जानेवारी, २०२४

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी सत्तेत बसलेल्यांचा आवाज फुटत नाही याची खंत.. खा. अमोल कोल्हे पुरंदर किल्ल्यावर शिवपुत्र शंभूराज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने प्रतिपादन



आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी सत्तेत बसलेल्यांचा आवाज फुटत नाही याची खंत.. खा. अमोल कोल्हे 


पुरंदर किल्ल्यावर शिवपुत्र शंभूराज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने प्रतिपादन 

पुणे । दि. १६
छत्रपती संभाजी महाराजांचा जेंव्हा राज्याभिषेक झाला तो काही साधा सुधा नव्हता. ती काटेरी वाट चालायची होती. ती फितुरीची वाट मोडून काढायची होती. अण्णाजी पंतांना हत्तीच्या पायी तुडवून दिल्लीच्या तख्तापुढे न झुकता रयतेसाठी ताठ मानेने कायम लढायचे होते. तेंव्हा आमचे धाकले धनी सिंहासनावर बसू शकले. हा इतिहास पुन्हा पुन्हा जेंव्हा पुनरावृत्तीत होतो. आज त्याच महाराष्ट्रातील सत्ताधारी दिल्लीवरून ढुमकं वाजलं अन् नंदिबैलासारख्या माना डोलवत असतील. तर मग माझ्या कांदा, दूध, सोयाबीन, कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचं काय ? असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी शिवपुत्र श्री शंभूराज्याभिषेक ट्रस्ट द्वारा आयोजित राज्याभिषेक सोहळ्यानिमीत्त पुरंदर किल्ल्यावर राज्यसरकारला विचारला आहे. ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधवराव, सत्यशोधक  चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक निलेश जळमकर, संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड, संघटक सचिन सावंत देसाई, अजयसिंह सावंत उपस्थित होते. 

सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराजांच्या  स्मारकाचे पूजन करुन पालखी सोहळा काढण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शंभू राजांचा दही, दूध, पंचामृत व नाण्याने राज्याभिषेक करण्यात आला. डॉ कोल्हे पुढे म्हणाले इतिहास फक्त गवगवा करण्यासाठी, घोषणा देण्यासाठी, अभिनिवेशासाठी नसतो तर इतिहासाची प्रेरणा घेऊन वर्तमान बनवता आला पाहिजे. तर त्या इतिहासाला आपण खरी आदरंजली देतो, खरे स्मरण करतो आणि खरी प्रेरणा घेत असतो. आज आम्ही त्या पराक्रमी राजधुरंदर शंभु राजांचा जयजयकार करीत असू आणि जर आमच्या राज्यातले सत्ताधारी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी, तरुणांसाठी मान उंचाऊन, दिल्लीच्या नजरेला नजर भिडवून प्रश्न विचारत नसतील. तर मला वाटतं या राज्याभिषेक सोहळ्यातून त्यांनी अनेक प्रेरणा घेणं गरजेचं आहे असे खडे बोल डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केले. 

संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांनी फुले दांपत्याने काळाच्या पुढचा विचार करत शिक्षण, सामाजिक सुधारणा, धर्म चिकित्सा, प्रबोधन इत्यादि विविध क्षेत्रांत केलेले काम, त्यामागचा संघर्ष, त्यांचे सहजीवन ज्या चित्रपटात सुंदररित्या रेखाटला त्या महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित “सत्यशोधक” चित्रपटाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले आजच्या काळात सामाजिक, सांस्कृतिक संघर्ष वाढीस लागला आहे. चित्रपटांच्या माध्यमातून धर्मांधतेची भावना वाढीस लावण्याचे प्रकार पहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर आलेला सत्यशोधक चित्रपट हा वैचारिक चळवळीतील तमाम कार्यकर्त्यांना एक प्रकारे उर्जा देणारा चित्रपट आहे. कर्मकांड, अवडंबर म्हणजे धर्म नसतो, तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य देतो तो खरा धर्म असतो, हा चित्रपटाने दिलेला विचार आता एक चळवळ बनला पाहिजे. तुमच्या आमच्यातील सामान्य लोकांनी एकत्र येऊन केलेल्या या प्रयत्नाला बळ म्हणून आपण सर्वांनी हा चित्रपट आपल्या नजीकच्या सिनेमागृहात जाऊन पाहावा. धनवंतानी सामूहिक शो दाखवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती केली. 

सत्यशोधक चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या विचारधारेतून तावून, सुलाखून बनलेला सत्यशोधक सिनेमा असून सुनिल शेळके, जयश्री शेळके, प्रविण तायडे, आप्पा बोराटेंसारखे निर्माते,  सोबत घेऊन समविचारी माणसांनी या चित्रपटात आपला जीव ओतला. त्यामुळे ही कलाकृती आकृतीत आली. सात वर्षाचा दीर्घ प्रवास, मोठ्या संकटातून हा सिनेमा इथपर्यंत आलाय. इथे बसलेला माणूस हजार, लाखो लोकांचं प्रतिनिधीत्व करतो. त्यामुळे प्रत्येकाने नैतिक जबाबदारी म्हणून हा चित्रपट कसा यशस्वी करता येईल यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. 

यावेळी उद्योजक किरण वेडे पाटील, सामाजिक क्षेत्रात ७०० मुलांना दत्तक घेणारे ॲड. संतोष पवार, कृषी क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे अनिल जाधव, क्रीडासाठी शुभम थोरात यांना शंभूगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अनिल माने, नागराज लावंड यांनी संपादित केलेल्या श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा २०२४ विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. गडावर रक्तदान शिबीरही आयोजित करण्यात आले होते. विशेषत: अनेक महिलांनीही यावेळी रक्तदान केले. प्रासाताविक संभाजी ब्रिगेडचे खजिनदार व ट्रस्टचे अध्यक्ष अमोलभैया काटे यांनी, सूत्रसंचालन संघटक प्रदिप कणसे यांनी केले तर आभार सचिन सावंत देसाई यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदिप कणसे, हर्षवर्धन मगदूम, अनिल माने, शुभम काळे, अजित कारले,नागराज लावंड, वैभव शिंदे, प्रशांत नरवडे, संतोष पवार, कैलास कणसे, रवी पवार शिवपुत्र शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्ट व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा