Breaking

शनिवार, २८ जानेवारी, २०२३

टेंभुर्णी रोटरी क्लबच्या वतीने मुकुंद रामदासी व सिद्धेश्वर शिंदे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित....



टेंभुर्णी रोटरी क्लबच्या वतीने मुकुंद रामदासी व सिद्धेश्वर शिंदे उत्कृष्ट  पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित....



बेंबळे।प्रतिनिधी सज्जन शिंदे।          

      टेंभुर्णी रोटरी क्लब आयोजित बळीराजा भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळावा अंतर्गत गुरुवार दिनांक 26 जानेवारी 23 रोजी पत्रकार समान सोहळा व व्यवसाय सेवा पुरस्काराच्या भव्य  कार्यक्रमांमध्ये बेंबळे येथील ज्येष्ठ पत्रकार मुकुंद रामदासी यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने व बेंबळे येथीलच सिद्धेश्वर शिंदे यांना उदयोन्मुख उत्कृष्ट  युवा पत्रकार पुरस्काराने, जिल्ह्याचे नेते व करमाळा- माढा विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते आमदार संजयमामा शिंदे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी  माजी प्रांतपाल तथा लातूर येथील दैनिक यशोदीप चे संपादक डॉक्टर ओमजी मोतीपवळे टेंभुर्णी रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप जाधव, माढा- पंढरपूर- माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व प्रकल्प प्रमुख रमेश पाटील रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष यशवंत हांडे रोटरी क्लबचे सचिव किशोर सलगर बेंबळे जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी व माढा तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती बंडूनाना ढवळे तसेच अशोक खटके आदी प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
              याबाबत विशेष वृत्त असे की सोलापूर जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष व जिल्हा वृत्तपत्र सृष्टीतील आदराचे व मानाचे स्थान असलेले पत्रकार स्वर्गीय विष्णुपंत कुलकर्णी- बेंबळेकर यांचे पासून प्रेरणा घेऊन सन 1988 पासून मुकुंद रामदासी यांनी आपल्या पत्रकारितेचा प्रारंभ केला. दैनिक संचार ,दैनिक तरुण भारत व पुढे 2007 पासून दैनिक पुण्यनगरी मधून राजकीय, सामाजिक ,औद्योगिक, शैक्षणिक, धार्मिक व तसेच साखर कारखानदारी, उजनी धरण व कृषी  क्षेत्रातील वृत्त , ग्रामीण जनजीवन व्यवस्थापन व अडीअडचणी याविषयी त्यांचे लिखाण समाजातील सर्व थरातील  नागरिकांना सदैव परिचित व प्रेरणादायी राहिले आहे, मागील 36 वर्षापासून मुकुंद रामदासी या क्षेत्रात कार्यरत आहेत.
      बेंबळे येथीलच सिद्धेश्वर शिंदे या युवा पत्रकाराने 2005 पासून दैनिक लोकमत मधून पत्रकारितेस प्रारंभ केला व सध्या ते पुढारी दैनिकातून कार्यरत आहेत. राजकीय ,सामाजिक, कृषी, शैक्षणिक, धार्मिक व जलसंपदा विभागातील त्यांचे लिखाण आदर्श व प्रेरणादायी ठरत आहे. उजनी धरणा विषयी त्यांचे अभ्यासपूर्ण लेख माहिती व बातम्या सर्वत्र नेहमी चर्चेचा विषय असतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला टक्कर देत शेती व्यवसायात सतत प्रायोगिक शेती करण्यासाठी त्यांचा सर्वत्र लौकिक आहे. निर्भीड ,निगर्वी,धाडसी, प्रामाणिक, निर्व्यसनी व्यक्ती म्हणून  व तसेच विविध राजकीय व सामाजिक उपक्रमात धडाडीने सहभाग घेणारे व्यक्तिमत्व म्हणून शिंदे यांचा लौकिक आहे, सध्या ते टेंभुर्णी शहर ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आहेत.
 टेंभुर्णी रोटरी क्लब ने आयोजित केलेल्या 25 जानेवारी ते 29 जानेवारी या पाच दिवसीय प्रदर्शन व शेतकरी मेळावा सोहळा यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे सर्व सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत. दररोज संपन्न होत असलेल्या भरगच्च कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मोकाशी व रोटरी क्लबचे सदस्य तथा युवा पत्रकार सचिन होदाडे हे करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा