३५० व्या शिवराज्याभिषेकापूर्वी रायगडावरील बहुतांश कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न
युवराज संभाजीराजे यांनी व्यक्त केला विश्वास
महाड – प्रतिनिधी
रायगड प्राधिकरणच्या वतीने किल्ले रायगडावर विविध कामे विकासात्मक कामे केली जात असून यातील अनेक कामे समाधानकारक झाल्याचे युवराज संभाजीराजे यांनी सांगून येणाऱ्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी बहुतांश कामे पूर्ण केली जातील असा विश्वास देखील पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी संभाजीराजे यांनी पुरातत्व विभागाच्या कांही नियमांच्या अडथळ्यात अनेक कामे प्रलंबित असल्याचे देखील सांगितले.
रायगडावर सुरु असलेल्या कामांची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांनी गडावर सुरु असलेल्या विविध कामांची सविस्तर माहिती देवून गडावर येणारा २५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा देखील जल्लोषात साजरा केला जात असून तत्पूर्वी गडावरील विविध विकासात्मक कामे आणि संवर्धनाची कामे पूर्ण करण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न असल्याचे युवराज संभाजीराजे यांनी सांगतले. गडावर सद्य स्थितीत असलेल्या तलावांची दुरुस्ती केली जात असून यातील हत्ती तलावाची जवळपास ९० टक्के गळती काढण्यास यश आल्याने यावर्षी देखील हत्ती तलावात पुरेसा पाणीसाठा साचला असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे नाणे दरवाजाची पुनर्बांधणी केली जात असून यातील अनेक दगड सापडले असून त्यांची जोडणी केली जात आहे. महादरवाजाची तटबंदी आणि मुख्य द्वार याची देखील शास्त्रोक्त पद्धतीने दुरुस्ती केली जात आहे. सन २०१६ पासून हे काम सुरु असून याकरिता शासनाने ६०० कोटी मंजूर केले होते मात्र या ६०० कोटीमधून २०० कोटी महाड रायगड मार्गासाठी असून सदर काम महामार्ग बांधकाम विभागाकडून सुरु आहे. यामुळे फक्त रायगड करिता कांही कोटी रुपयेच मिळाले असल्याचे सांगितले. गडावर होत असलेल्या खोदकाम हे पुरातत्व विभागाकडून सुरु असले तरी या कामाला गती नसल्याने प्राधिकरणकडे कांही साईट देण्याची मागणी देखील केली आहे.
येणारा शिवराज्याभिषेक हा ३५० वा शिवराज्याभिषेक असून याची तयारी देखील सुरु आहे. या सोहळ्याला देखील लाखो शिवभक्त रायगडावर येण्याची शक्यता आहे. यामुळे रायगड प्राधिकरण कडून सुरु असलेली विविध कामे यापूर्वी पूर्ण करण्याचा आमचा मानस असल्याचे युवराज संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. गडावरील कामे ही शास्त्रोक्त पद्धतीने सुरु असून प्रत्येकाला सिमेंटची गुळगुळीत कामे पाहण्याची सवय झाल्याने चुना, गुळ, आणि इतर नैसर्गिक घटकांच्या माध्यमातून केली जाणारी दीर्घ काळ टिकणारी आणि पर्यावरणाला पूरक अशी असल्याने कामे निकृष्ट पद्धतीने होत असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे देखील सांगितले. आवाज आणि लाईट शो ची उभारणी देखील गडावर केली जात असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगतले. गडावर विकासात्मक कामे करताना पुरातत्व विभागाच्या नियमांना अनुसरूनच केली जात असल्याने अनेक कामे पुरातत्व विभागाच्या परवानगीनंतर केली जातील असेही स्पष्ट केले.
रायगड मार्गावरील खड्डे भरण्याबाबत संभाजीराजेंच्या सूचना
किल्ले रायगड रस्त्याचे रुंदीकरण सुरु आहे. मागील ठेकेदाराने हे काम अर्धवट सोडून पळ काढल्यानंतर अक्षय कंपनीला हे काम देण्यात आले आहे. या कंपनीने हे काम गतीने सुरु केले मात्र ऐन पावसाळ्यापूर्वी कामाची क्षमता न पाहताच सर्व रस्ता खोदून टाकला. त्यातच कोंझर पासून पुढील रस्त्यात प्रचंड खड्डे पडले आहेत. यामुळे अनेक अपघात झाले आणि शिवभक्तांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. हे खड्डे भरून शिवभक्त आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा विचार केला पाहिजे अशा सूचना देखील संभाजीराजे यांनी संबंधित ठेकेदाराला दूरध्वनीवरून दिल्या. यावेळी गड आणि परिसरात प्रतिदिन पर्यटक, शालेय सहली, आणि शिवभक्त येतात मात्र त्याठिकाणी असलेल्या खाजगी हॉटेल मधून त्यांना स्वच्छतागृहात पैसे मोजावे लागत आहेत यामुळे शौचालय आणि स्वच्छतागृह यांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी स्थानिक पत्रकार निलेश पवार यांनी यावेळी करताच त्यांनी संबंधित अधिकार्यांना याबाबत सूचना देवून तत्काळ याबाबत कांही तरी कार्यवाही केली जावी असे सांगितले.
रायगड रोपवे बाबत गडकरींना पत्रव्यवहार
किल्ले रायगडावर असलेल्या रोपवेचे तिकीटदर सर्वात अधिक असून याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संभाजीराजे यांनी रोपवे बाबत आपणच आक्रमक असून शासनाला देखील आपण मागणी करत असून याबाबत नुकताच आपण नितीन गडकरी यांना पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले. शासनाने परवानगी दिल्यास अनेक मोठ्या कंपन्या स्वस्त दरात शिवभक्तांच्या सेवेकरिता पर्यायी रोपवे उभा करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा