सीना माढा उपसासिंचन योजनेतून तळी जोडण्याच्या कामांना लघुपाटबंधारे विभागाकडून 80 लाखांचा निधी - रणजितसिंह शिंदे
माढा तालुक्यातील विविध ठिकाणच्या 5 पाझर तलावांचा समावेश
माढा / प्रतिनिधी- (राजेंद्र गुंड-पाटील)
-उजनी धरणातून कार्यान्वित असलेल्या माढा तालुक्यातील सीना माढा या महत्त्वाच्या उपसासिंचन योजनेवर असलेल्या गावांमध्ये ठिकठिकाणी पाझर तलाव आहेत.यातील विविध ठिकाणच्या 5 पाझर तलावामध्ये पाणी सोडून तलाव भरुन घेणेसाठी पाणी वितरण व्यवस्था पाईपलाइन द्वारे करण्याच्या कामासाठी लघुपाटबंधारे विभागाकडून 80 लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले.
अधिक माहिती देताना जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे म्हणाले की, पावसाळ्यामध्ये धरणातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी वाया जाते त्याचा लाभ शेतकऱ्यांना होऊन त्या भागातील जलसिंचन क्षेत्रात वाढ होण्याच्या दृष्टीने आमदार बबनराव शिंदे यांनी सीना माढा उपसासिंचन योजनेतून पाझर तलाव पाईप लाईनव्दारे भरुन घेणेसाठी शासनाकडे मागणी केली होती.त्यामध्ये पाझर तलाव उपळाई (खुर्द)-(गोरेवाडी), पाझर तलाव वडाचीवाडी (उ.बु) - गाडेकर, पाझर तलाव लऊळ-(चाऊशे वस्ती), पाझर तलाव बैरागवाडी (सुर्वे लवण), पाझर तलाव व्होळे -(चोपडे शेत) या कामांसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व आ.बबनराव शिंदे यांच्या सहकार्यामुळे 80 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे त्यामुळे या निधीतून अनेक वर्षापासूनची शेतकऱ्यांची मागणी पूर्णत्वास येणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
आज वडाचीवाडी (उ.बु) येथे रविवारी शुभारंभ व भूमीपूजन - माढा तालुक्यातील वडाचीवाडी (उ.बु) येथील पाझर तलाव यापूर्वी जोडून देण्यात आला आहे.गाडेकर या पाझर तलावासाठी पाईपलाईन करण्याचा भूमीपूजन समारंभ जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांचे हस्ते 6 मार्च रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केल्याची माहिती सरपंच कल्पना रामेश्वर कोळी व माजी सरपंच शंकर डोंगरे यांनी दिली असून या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील शेतकरी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
फोटो ओळी- जि. प. सदस्य रणजितसिंह शिंदे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा