Breaking

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

हळदीच्या वाढत्या उत्पादनातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल - कृषिमंत्री दादाजी भुसे


हळदीच्या वाढत्या उत्पादनातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल - कृषिमंत्री दादाजी भुसे 


नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

नांदेड : हळद उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा वाढविण्यासाठी खासदार श्री. हेमंत पाटील, हिंगोली लोकसभा तथा अध्यक्ष, हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून  रविवार 23 जानेवारी 2022 रोजी हिंदुहृदयसम्राट कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी एक दिवसाचे राज्यस्तरीय हळद कार्यशाळेचे आयोजन कै. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व कृषी विभागामार्फत करण्यात आले.
      आज (दि.२३) एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्‍या माध्यमातून महाराष्ट्रातील  शेकऱ्यांसाठी निश्चितच हळद लागवडीचे क्षेत्र वाढून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले. "हळद काढणी ते गुणवत्ता वाढ, मार्केटिंग आणि एक्सपोर्ट पर्यंत  असे विविध विषयावर आयोजित ऑनलाईन कार्यशाळेचे उदघाट्न मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेला खासदार हेमंत पाटील, माजी खासदार ऍड. शिवाजी माने, आ. संतोष बांगर , आ. बालाजी कल्याणकर, गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील, फेडरेशन चे संचालक नवनाथ देवकर यांच्यासह सर्व हळद शेतकरी बंधू, शेतकरी उत्पादक कंपनी आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून कै. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक धवण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

     कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. श्री. कैलास मोते संचालक फलोत्पादन, कृषी आयुक्तालय, पुणे यांनी केले तर मान्यवरांचे आभार एस. के. दिवेकर, विभागीय कृषी सहसंचालक, लातूर यांनी मानले कार्यशाळेचे ऑनलाइन नियोजन आणि सूत्रसंचालन सीए मयूर मंत्री यांनी केले.
              कार्यशाळेचे उदघाट्न करताना कृषिमंत्री दादाजी भुसे म्हणाले कि, आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी आयोजित केलेल्या कार्यशाळेतून नक्कीच चांगले आणि महत्वाचे मुद्दे समोर येतील ज्यांचा उपयोग भविष्यात राज्यातील हळदीचे उत्पादन वाढविण्यासाठी उपयोगी येतील.  हळद धोरण अभ्यास समितीने अहवाल सादर केल्यास याबाबतचे पुढचे धोरण आखायला मदत होईल आणि यामुळे राज्यातील हळद उत्पादनाचा आणि लागवडीचा टक्का वाढण्यास मदत होणार आहे. परिणामी यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल यात दुमत नाही.  हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे लाडके व अभ्यासू खासदार हेमंत पाटील यांचे अभ्यासपूर्ण विवेचन याबाबतीत मोलाचे आहे. आजच्या कार्यशाळेच्या माध्यमातून जो काही निर्णय समोर येईल तो पुढे सादर केला जाईल .कार्यशाळेत  प्रामुख्याने हळद संशोधन आणि विकास,  हळद बेणे, हळद उत्पादन तंत्रज्ञान, सेंद्रिय हळद आणि लागवड तंत्रज्ञान, हळद काढणी, हळद काढणी पश्चात प्रक्रिया, हळद विपणन, हळद ट्रेसेबिलीटी आणि निर्यात, अशा विविध विषयांवर देशभरातील विविध क्षेत्रांतून नामवंत वक्ते आणि तज्ञ शास्त्रज्ञानी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.तसेच यावेळी राज्यातील यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा सुध्दा घेण्यात आल्या. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चासत्रही घेण्यात आले.
             यावेळी बोलतांना खासदार हेमंत पाटील म्हणाले कि, मागील वर्षभरापासून हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीचे कामकाज सुरु आहे . आजच्या काळात हळद पिकाला मसाले , सौंदर्य प्रसाधने, औषधी  उत्पादनात मागणी वाढत आहे. अत्यंत कमी कालावधित कमी खर्चात हे पीक शेतकऱ्यांना मोठा फायदा देऊन जाणारे आहे त्यामुळे यावर होणारा खर्च आणखी कमी कसा करता येईल आणि शेतकऱ्यांना हळद काढणीच्या वेळी होणाऱ्या  अडचणी कश्या सोडवता येतील हा या कार्यशाळेमागचा उद्देश आहे. हळद हे नगदी पीक असल्यामुळे शेतकऱ्यांच याकडे कल वाढत असून भविष्यकाळात तो आणखी वाढावा यासाठी देशपातळीवर कार्य करणारे शास्त्रज्ञ, संशोधक यांच्या ज्ञानाचा उपयोग निश्चितच यासाठी करून घेतला जाईल . तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते 
गोदावरी फाऊंडेशन व स्पाइस बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने व तुकाई शेतकरी उत्पादक कंपनी नांदेड संचलित नांदेड येथे प्रथमच शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हळद चाचणी केंद्राचा भव्य शुभारंभ करण्यात आला.या कार्यशाळेला महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे व भारतीय कृषी अनुसंधान परिषद भारत सरकार,कै. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी,डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांचे सहकार्य लाभले.

               या एकदिवसीय  ऑनलाइन कार्यशाळेला देशभरातून अनेक शास्त्रज्ञ , संशोधक, शेतकरी मोठ्या संख्येने झूम आणि फेसबुक लाईव्ह या सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा