सीना -माढा सिंचन योजनेचे पाणी तुळशी- बावी- अंजनगाव सहीत एकुण सात गावांना मिळणार......
....मानेगाव उपसा सिंचन योजनेचा कार्यान्वित होणार......
.......भीमा-सीना बोगद्यातून बेंद ओढ्यात पाणी सोडण्यात येणार.....
आ. बबनदादा शिंदे, आ.संजय मामा शिंदे
बेंबळे।प्रतिनिधी.. मुकुंद रामदासी। AJ 24Taas News Network
सीना- माढा सिंचन योजनेचे पाणी मिळण्यापासून वंचित राहीलेल्या तुळशी, बावी, अंबाड ,कुर्डू ,पिंपळखुंटे, अंजनगाव (माढा) व परिते वाडी या सात गावांना सिंचन योजनेचे पाणी मिळावे यासाठी शासनाकडे पूर्वीच प्रस्ताव सादर केला असून यावर सविस्तर आणि सखोल चर्चा होऊन शेरे पूर्तता करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे निर्देश कृष्णा खोरे विकास महामंडळ, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच टी धुमाळ यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत दिले आहेत. त्याच प्रमाणे सीना नदीवरील खैराव येथील बंधाऱ्यातून मानेगाव उपसा सिंचन योजना तातडीने कार्यान्वित होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. या बैठकीत भीमा- सीना जोड कालव्यावरील शाप्ट क्रमांक 3 मधून बेंद ओढ्यात पाणी सोडण्याचा महत्त्वाचा पुर्तता प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. तसेच करमाळा तालुक्याची वरदायिनी ठरलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पंप हाऊस, मोटारी दुरुस्ती व इतर आवश्यक टेक्निकल दुरुस्त्या करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे.
भिमानगर (उजनी धरण) येथे आज झालेल्या बैठकीत हे सर्व निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे व संजय मामा शिंदे यांनी दिलेली आहे. या बैठकीस मुख्य अभियंता एच टी धुमाळ, जिल्हा परिषद सदस्य रणजीत भैय्या शिंदे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव बगले, कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे ,क्षिरसागर, हरसुले कोंडेकर, जोशी, सोलापूरच्या श्रीमती गावडे मॅडम तसेच उपअभियंता व शाखा अभियंता उपस्थित होते. या बैठकीत भीमा व सीना नदीवर बॅरेजेस बांधणे तसेच बुडीत बंधारे बांधणे व काही गावच्या पाणीपुरवठा संस्था प्राधान्याने तयार करणे यावरही विचारविनिमय करण्यात आला.
सविस्तर वृत्तांत असा की उजनी धरण जरी माढा तालुक्याच्या पश्चिमेला अगदी तालुक्याच्या उशाला असले तरी कालवा सिंचनाखाली माढा तालुक्यातील फक्त चौदा गावचे क्षेत्र ओलिताखाली येते .आमदार बबनदादा शिंदे 1995 सारी आमदार झाले आणि त्यांनी उजनी धरणाच्या मुख्य पातळीपासून उंचावर असलेल्या माढा तालुक्यातील हजारो एकर क्षेत्रासाठी पाणी मिळावे म्हणून सीना माढा सिंचन योजना कार्यान्वित करण्याचा सातत्याने पाठपुरावा केला, व म्हणूनच आज 42 गावातील चाळीस हजार एकर क्षेत्र या योजनेखाली ओलीतास आलेले आहे. असे असले तरी याच तालुक्यातील तुळशी ,बावी, कुर्डू, अंबाड, पिंपळखुंटे, अंजनगाव ( खेलोबा) व परितेवडी अशा सात गावाच्या उंचवट्यावर या योजनेचे पाणी पोहोचणे अडचणीचे ठरत होते. परंतु आमदार बबनदादा शिंदे यांनी वेगवेगळ्या प्रकारे माहिती घेऊन व टेक्निकली या गावांना पाणी कसे पोहोचले जाते हे शासनास पटवून देऊन त्याचा प्रस्ताव सादर करून सातत्याने आजपर्यंत पाठपुरावा केला आहे व आज भिमानगर येथे झालेल्या बैठकीत मुख्य अभियंता धुमाळ यांनी सीना माढा सिंचन योजनेतून या गावांचे क्षेत्र ओलिताखाली यावे म्हणून शेरे पुर्तता करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे व तसे निर्देश दिले आहेत. यामुळे लवकरच या भागातील हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणार हे निश्चित. या बैठकीत माढा तालुक्यातील पूर्वेकडे असलेल्या सिनेकाठच्या मानेगाव परिसरातील क्षेत्र ओलिताखाली यावे म्हणून सीना नदीवरील खैराव बंधाऱ्यातून मानेगाव उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव शासनाला सादर केला असून ही योजना तातडीने कार्यान्वित होणेकामी सातत्याने निश्चित पाठपुरावा करण्यात येईल , असे आमदार बबनदादा शिंदे यांनी आवर्जून सांगितले.
या बैठकीत आमदार संजय मामा शिंदे यांनी सुचवल्याप्रमाणे व यापूर्वीच आमदार बबनदादा शिंदे यांनी शिफारस केल्या प्रमाणे भीमा - सीना जोड कालवावरील शाप्ट क्रमांक 3 मधून बेंद ओढ्यात पाणी सोडण्याच्या महत्त्वाच्या योजनेसाठी शेरे पूर्तता प्रस्ताव सादर करण्यात आला. तसेच करमाळा तालुक्यातील वरदायिनी ठरलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पंप हाऊस, विद्युत मोटारी व इतर टेक्निकल दुरुस्त्या करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला व या दुरुस्तीची कार्यवाही तातडीने करण्यात यावी असे आमदार संजय मामा शिंदे यांनी सुचवले. बेंद ओढ्यात पाणी सोडल्यानंतर ओढ्यावर आवश्यक त्या ठिकाणी बंधारे बांधून हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यामध्ये ढवळस परिसरातील ७-८ गावे तसेच माढा , महातपूर व दारफळ शिवारातील शेकडो एकर क्षेत्र ओलिताखाली येणार हे निश्चित. या बैठकीला वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत जलसंपदा विभागाचे उप अभियंता व शाखा अभियंता हे देखील उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा