विठ्ठलवाडीचे सुपुत्र नितेश कदम यांची नायब तहसीलदारपदी निवड
शेतकऱ्याचा मुलगा बनला अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर अधिकारी
माढा / प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या सन 2019 च्या स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील नितेश नेताजी कदम याची पूर्वी उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली होती परंतु या नव्याने घोषित सुधारित निकालानुसार त्यांची नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे.निवडीचे वृत्त कळताच गावातील मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी पेढे वाटत तोफांची सलामी देत आनंदोत्सव साजरा केला.
या परीक्षेचा निकाल कोरोनाची पार्श्र्वभूमी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे लांबला होता.आता उशीराने का होईना सुधारित अंतिम निकाल जाहीर झाल्यामुळे विठ्ठलवाडी गावाला आणखी एक अधिकारी मिळाला आहे.एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील नितेश कदम याने 900 पैकी 523 गुण प्राप्त करून खुल्या प्रवर्गातून मिळवलेले यश निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.नितेशचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षण संभाजीराव चव्हाण विद्यालय आणि नवोदय विद्यालय पोखरापूर,बीएससी ची पदवी पुणे येथील फर्गुसन कॉलेजमध्ये गणित विषयांतून घेतली.विशेष बाब म्हणजे कोठेही खाजगी शिकवणी न लावता हे उज्ज्वल यश संपादित केले आहे.त्याचे वडील नेताजी कदम हे शेतकरी असून आई इंदूमती कदम या अंगणवाडी शिक्षिका आहेत.त्याचे थोरले बंधू निलेश कदम हे भारतीय सैन्यदलात कार्यरत असून बहिण निरुपा ही उपप्रादेशिक परिवहन खात्यात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.याकरिता त्यास सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड, पोलीस उपअधीक्षक सचिन कदम,गणेश गुंड, ज्ञानेश्वर मस्के यांचे मार्गदर्शन लाभले असून त्याचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
नितेशच्या उज्ज्वल यशामुळे त्याच्या आई-वडिलांनी मुलास अधिकारी बनविण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न साकार झाले आहे.निवडीनंतर नूतन अधिकारी नितेशच्या आई-वडिलांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र भांगे,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, सज्जन मुळे,सुजाता भांगे,सुवर्णा भांगे यांनी पेढे भरवून अभिनंदन केले.
1) नूतन नायब तहसीलदार नितेश कदम.
2) विठ्ठलवाडी येथील नूतन नायब तहसीलदार नितेश कदम यांच्या आई-वडिलांना पेढे भरवून अभिनंदन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रामचंद्र भांगे, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड व इतर.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा