Breaking

सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

अन्यथा बारामतीच्या 'जाणता राजा' च्या दारातुन आंदोलनाला सुरुवात* कारखाने सुरु होण्यापूर्वी ऊस वाहतुकदार व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा* जनशक्ती संघटनेने दिला इशारा........



... अन्यथा बारामतीच्या 'जाणता राजा' च्या दारातुन आंदोलनाला सुरुवात

* कारखाने सुरु होण्यापूर्वी ऊस वाहतुकदार व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा


* जनशक्ती संघटनेने दिला इशारा........




प्रतिनिधी/AJ 24 Taas News


सन २०२१-२२ चा गळीत हंगाम दीड ते दोन महिन्यांमध्ये सुरू होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची आपली वाहने  ऊस वाहतुकीसाठी विविध साखर कारखान्याबरोबर वाहतुक करार करण्यासाठी लगबग सुरु आहे.  मात्र २०१६ - २०१७ पासून वाहतूक दरामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही. त्या वेळी डिझेल दर ६४ रुपये प्रति लिटर होता. आज डिझेल दर जवळपास १०० रुपये प्रतिलिटर  झालेला आहे. तरीही कारखानदार त्यांना दरवाढ देण्यास तयार नाही. शिवाय गाळपास आलेल्या ऊसाची 


 एफ आर पी किती आहे..? ती किती टप्प्यात देणार..? पहिला हप्ता किती..? हे कारखान्याचं धुराडं पेटण्याआधी कळवा. यासाठी राज्यातील कारखानदारांचे बॉस आणि शेतकऱ्यांचे कैवारी समजले जाणारे माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा अन्यथा बारामती येथुन जाणता राजा च्या घरासमोरुन आंदोलनाला सुरुवात करुन राज्यभर आंदोलने केली जातील असा गर्भित इशारा जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकऱी जोडधंदा म्हणून ऊस वाहतुकीचा व्यवसाय करत आहेत. वाहतूकीच्या वाहनांची संख्या जास्त असल्याचा कारखानदार गैरफायदा घेत आहेत. एकीकडे वाहन घरी ठेवून परवडत नाही तर दुसरीकडे तोटा सहन करत ऊस वाहतूक करण्याची नामुष्की त्याच्यावर ओढावली आहे.  शिवाय पूर्वी ऊसतोड कामगारांसाठी कारखान्यांकडून ॲडव्हान्स दिला जायचा हाच तो दिला जात नाही आणि दिलाच ॲडव्हान्स तरी टोळी येईल का नाही याची खात्री नसते. त्यामुळे कारखानदार त्या टोळीचा सर्व खर्च ऊस वाहतूक दारांच्या अंगलट लावून त्यांची वाहने जप्त करतात. त्यामुळे याठिकाणी शेतकरी ऊस वाहतूकदार एकटा या गोष्टीसाठी कारणीभूत न धरता कारखानदारांनी देखील याची जबाबदारी घेतली पाहिजे.

 शिवाय मागील गळीत हंगामाची एफआरपी अद्यापही अनेक कारखानदारांनी दिली नाही. त्यामुळे यंदाचा गळीत हंगाम सुरू होण्याच्या पूर्वी उसाची एफआरपी किती..? किती रकमेत कारखाना देणार..? पहिली उच्चल किती देणार..? याबाबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कळवावे अशी विनंती सहकारमंत्री, साखर आयुक्त व सर्व कारखानदारांकडे अतुल खुपसे पाटील यांनी केली आहे. 
यावेळी रोहन नाईक नवरे, भैरव इटकर, कल्याण गवळी उपस्थित होते. 

चौकट 

ऐनवेळी धावपळ नको

- राज्यातील साखर कारखाने सुरू होण्यासाठी अजून एक ते दीड महिन्याचा अवधी आहे. त्यामुळे या सर्व साखर कारखानदारांची बैठक घेऊन ऊस वाहतूकदार व शेतकऱ्यांच्या उसाच्या रकमेबाबत राज्य शासन, साखर आयुक्त, सर्व साखर कारखानदार आणि महत्त्वाचं म्हणजे माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी ठोस पाऊल उचलावे. पुन्हा कारखान्याची धुराडी पेटली जातात आणि वेगवेगळ्या घटनांची आंदोलनांची धावपळ सुरू होते. यामध्ये ऊस वाहतूकदार ट्रॅक्टर चालक मालकांची आणि शेतकऱ्यांची परवड होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा