Breaking

शनिवार, ११ सप्टेंबर, २०२१

शेतकरी व ऊस वाहतूकदारांच्या प्रश्नासाठी पंढरपूरमध्ये खुपसे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली जनशक्ती संघटनेचे भव्य मेळाव्याचे आयोजन



 शेतकरीऊस वाहतूकदारांच्या प्रश्नासाठी पंढरपूरमध्ये खुपसे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली जनशक्ती संघटनेचे भव्य मेळाव्याचे आयोजन



पंढरपूर | सन २०२१-२२  या वर्षातील ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखानदारांनी व सरकारने ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूकदार व ऊस तोडणी कामगार यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी, जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथे, रविवार दिनांक : १२/०९/२०२१ रोजी भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात संदर्भात प्रदेशाध्यक्ष, अतुल खूपसे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.



 त्यांनी सांगितले की, राज्यातील स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी व साखर सम्राटदारांचे बॉस समजणारे माजी कृषीमंत्री, शरद पवार यांनी या समस्यात लक्ष घालून त्या सोडवाव्यात अशी मागणी करणार आहोत. तसेच ऊस-उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाची तोडणी करण्यापूर्वी त्यांना एफआरपी किती देणार आहे ? तसेच तो किती टप्प्यात देण्यात येईल ? पहिला टप्पा किती रकमेचा असेल ? या संदर्भात सविस्तर माहिती जाहीर करावी. अन्यथा आम्ही सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीने, शरद पवार यांच्या बारामतीमध्ये जाऊन त्यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहोत, असा इशारा ही दिला आहे.


तसेच सन २०१६-१७ या सालापासून कारखानदारांनी व सरकारने ऊस वाहतूक दरामध्ये कोणत्या ही प्रकारची वाढ केलेली नाही. नियमितपणे वरचेवर डिझेलचे दर वाढत आहेत. त्यावेळी ६७ रुपये लिटर असणाऱ्या डिझेलचे दर आता १०० रुपये लिटर झालेले आहेत. तरी ही कारखानदारांनी व सरकारने वाहतूक दरात कोणतीच वाढ केलेली नाही. त्यामुळे सरकारने व कारखानदारांनी ऊस वाहतूक दरामध्ये वाढ करण्याची ही मागणी या मेळाव्यात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

 ऊस-वाहतूक करणारे व्यावसायिक, शेतीला जोडधंदा म्हणून ऊस-वाहतुकीचे काम करत आहेत. सध्या वाहनांची संख्या अतिशय वाढलेली असल्याचा गैरफायदा कारखानदार मंडळी उचलत आहेत व कमीत कमी दरात ऊस वाहतूक करण्यास वाहतूकदारांना मजबूर करत आहे. अशा पद्धतीने ऊस वाहतूकदाराचे ही आर्थिक शोषण कारखानदार करत आहे. त्यामुळे ऊस वाहतूक दरामध्ये निश्चित वाढ करून मिळावी, अशी मागणी ही या मेळाव्यात केली जाणार आहे. त्याचबरोबर ऊस तोडणी कामगारांच्यासाठी यापूर्वी ऊस वाहतूकदारांना कारखान्याकडून ऍडव्हान्स रक्कम देण्यात येत होती. 

ती रक्कम ही कारखान्यांनी सध्या बंद केलेली आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्यांना ऊस तोडणी कामगारांची जमवा-जमव करत असताना अनंत अडचणी येत आहेत. त्यामुळे कारखान्यांनी ऊस वाहतूक दारांना ऊस तोडणी कामगारांच्यासाठी ऍडव्हान्स रक्कम पूर्वीप्रमाणेच देण्याची व्यवस्था करावी. त्याचबरोबर ऊस तोडणी कामगारांची जबाबदारी ऊस वाहतूक दारांच्या बरोबरच कारखान्याने ही स्वीकारावी, अशी मागणी ही करण्यात येणार आहे.
पाठीमागील वर्षी घोषित केलेली एफआरपीची रक्कम  अनेक कारखानदारानी अजूनही शेतकऱ्यांना दिलेली नाही. 

सदरची रक्कम ज्या कारखान्यांनी थकित ठेवलेली आहे, त्या कारखान्याचे धुराडे एफआरपीची बाकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याशिवाय पेटवू देणार नाही. त्याच बरोबर चालू गळीत हंगामाची एफआरपीची रक्कम घोषित करून, तिच्या वितरणाचे स्वरूप ही स्पष्ट करावे. अशी मागणी जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे-पाटील यांनी केली आहे. सदर पत्रकार परिषदेला रोहन नाईकनवरे, भैरव इटकर, कल्याण गवळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात केल्या जाणाऱ्या मागण्या सरकारने व कारखानदारांनी मान्य केल्या नाहीत, तर आम्ही त्यानंतर शेतकऱ्यांचे कैवारी, शरद पवार यांच्या घरी बारामतीत जाऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत, असा इशारा ही त्यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा