शेतीला वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड हीच खरी उत्पादनवाढीची गुरुकिल्ली-
. .....कृषिकन्या प्रतिक्षा कावळे
बेंबळे।प्रतिनिधी। फोटो
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट महाविद्यालय बारामती आयोजित ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषिकन्या प्रतिक्षा दशरथ कावळे यांनी बेंबळे यथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांच्या पिकांची पाहणी करून त्यांना मार्गदर्शन केले. तसेच काही प्रगतिशील शेतकऱ्यांचा सल्ला घेऊन, मार्गदर्शन घेऊन इतरांनीही फायदा करून घ्यावा असा सल्ला दिला .
प्रतिक्षा कावळे म्हणाल्या की बेंबळे गावातील शेतकरी सोमनाथ हुलगे हे पारंपारिक पद्धतीने शेती करत होते., सन 2006 पर्यंत ते उसाचे पीक पिकवत होते. नंतर त्यांनी पीक बदल करावा या धोरणाने केळी या पिकाची लागवड केली. लागवडीनंतर त्यांना त्यातून चांगले उत्पन्न मिळू लागले पण एकच पीक सातत्याने शेतात घेतल्यामुळे नंतर हळूहळू उत्पादनात घट होत गेली. त्यानंतर त्यांनी सन 2020 ला पुन्हा उसाची लागवड केली. ती उसाची लागवड करत असताना त्यांनी पारंपारिक शेतीबरोबरच वैज्ञानिक रित्या शेती करण्याचे ठरवले. त्यांनी लागवडीपूर्वी योग्य रीतीने माती परीक्षण करून घेतले व ऊस या पिकासाठी आवश्यक असलेले प्राथमिक खत त्यांनी योग्य प्रकारे दिले. चांगल्या उत्पादनासाठी त्यांनी नत्र, स्फुरद ,पलाश यांची योग्य मात्रा पिकाला दिली, तसेच त्यांनी मोठा झालेल्या उसाचे पाचट काढणी व त्याच ठिकाणी सरीत पाचट पसरणे हा एक नवीन प्रयोग करून पाहिला. त्यामुळे त्यांना असा फायदा झाला की उसात हवा खेळती राहिली व नवीन फुटवा होण्यास मदत झाली, पाला योग्य रीतीने जमिनीत कुजला व त्याचाही कंपोस्ट खत म्हणून फायदा झाला. पारंपारिक शेतीबरोबरच वैज्ञानिक गोष्टींचा आधार घेतल्यामुळे आज ते उसाचे एकरी 100 ते 110 टन एवढे उत्पन्न काढत आहेत आणि त्यातून त्यांना भरघोस असा फायदा होत आहे.
बेंबळे येथील शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना प्रतीक्षा कावळे यांनी असे सांगितले की शेतकऱ्यांनी गट शेती करून ठराविक पिकांचे तसेच केळी, द्राक्ष, डाळिंब, पपई आदी फळबागांचे उत्पन्न घेतले पाहिजे. याचा फायदा असा होतो की त्यामुळे बाजारपेठेत पिकाला योग्य असा दाम मिळतो आणि एकमेकांच्या सल्ल्यानुसार आणि अनुभवानुसार शेतात उत्पादन वाढीसाठी खूप मदत होते .त्यांनी सर्व शेतकऱ्यांना असे आव्हान केले की सर्वांनी गटाने एकरूप होऊन शेती करावी व पारंपारिक बरोबरच वैज्ञानिक बाबींची ही जोड शेतीला द्यावी आणि त्यातून भरघोस उत्पन्न घ्यावे.
याप्रसंगी प्रतिक्षा कावळे यांनी पिक विमा योजना, बँकेचे कर्ज प्रकरण तसेच अत्याधुनिक शेतीसाठी आवश्यक असणारे माहिती आणि तंत्रज्ञान विषयी मार्गदर्शन व माहीती मिळण्याची ठिकाणे, अल्पभूधारक व महिला शेतकरी यांच्यासाठी शासनाकडून मिळणारे फायदे याविषयीही सर्वांना सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना कृषिकन्या प्रतिक्षा कावळे यांनी विश्लेषणात्मक उत्तरे दिली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा