*पंचनाम्याचा फार्स न करता शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसान भरपाई देण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी*
*अतुल वारे पाटील- करमाळा*
परतीच्या पावसामुळे करमाळा तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून पंचनामा, अहवाल असे कागदी घोडे न नाचवता शेतकऱ्यांना बांधावर सरसकट मदत देण्याची मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आली आहे.
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड तसेच डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद यांच्या वतीने तहसीलदार करमाळा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील,संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ, तालुकाध्यक्ष अमित घोगरे ,डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद तालुका सचिव संतोष शितोळे,राजेंद्र पोळ आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अमित घोगरे म्हणाले की, करमाळा तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे ऊस, केळी, कांदा, पपई आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.100 टक्के पिके वाहून गेली आहेत. सर्व पिके भुईसपाट झाली आहेत. शेतकरी प्रचंड तणावाखाली असून मुलीचे लग्न,मुलांचे शिक्षण, कर्ज अशा अनेक समस्यांनी त्याला घेरले आहे.शासकीय यंत्रणा मात्र पंचनामा करणे,अहवाल पाठवणे यामध्ये अडकून पडलीआहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले असून त्याला तातडीने मदतीची गरज असल्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना बांधावर मदत करावी अन्यथा संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करेल असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा