राज्यातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात बेदाणे (मनुका) दिले जाणार ......
आमदार बबनदादा शिंदे यांच्या लक्षवेधीवर फलोत्पादन मंत्री ना.भुमरे यांचे उत्तर...... ..
...बेदण्यावरील बँक कर्जाचे व्याज शासनाने भरावे....
पाच टक्के जीएसटी माफ करण्यात यावा....
.....आ. बबनदादा शिंदे यांची सभागृहात मागणी
बेंबळे। प्रतिनिधी।
" यावर्षी राज्यात द्राक्षाचे पीक मोठ्या प्रमाणात उत्पादित झाले असून मागणी नसल्यामुळे कवडीमोल दराने द्राक्षाची विक्री करावी लागली व शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी द्राक्षाला भाव मिळत नसल्यामुळे द्राक्षापासून बेदाणे(मनुका) निर्मिती केली, परंतु याला सुद्धा मागणी नसल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचा हजारो टन बेदाणा शीतगृहात अद्याप देखील पडून असून द्राक्ष व बेदाणे उत्पादकावर दुहेरी संकट ओढवले आहे. सध्या सोलापूर व सांगली जिल्ह्यातील शीतगृहे बेदाण्यानी फुल्ल भरून गेलेली आहेत, तर गरजू शेतकरी कवडी मोलाने बेदाण्याची विक्री करत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश केल्यास शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळेल. काही शेतकऱ्यांनी शीतगृहातील बेदाण्यावर बँकेकडून कर्ज घेतले आहे, त्या कर्जावरील व्याज शासनाने अनुदान स्वरूपात द्यावे, यासाठी काही संघटनानी देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून मागणी केलेली आहेच ,तसेच शेतकऱ्याकडून बेदाणा खरेदी केल्यानंतर पाच टक्के( विक्री व सेवा कर) जीएसटी आकारला जातो तो पाच टक्के जीएसटी माफकरण्यात यावा व अशा प्रकारे द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढावे, याबाबत शासनाची कार्यवाही व उपायोजना काय--? असा लक्षवेधी प्रश्न आमदार बबनदादा शिंदे यांनी आज सभागृहात उपस्थित केला होता.
या लक्षवेधीला उत्तर देताना फलोत्पादन व रोजगार मंत्री नामदार संदिपान भुमरे म्हणाले की राज्यात प्रामुख्याने नाशिक, सांगली ,सातारा, सोलापूर ,अहमदनगर ,जालना, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. राज्यात यावर्षी 2477.36 हजार मे.टन द्राक्ष उत्पादन झाले आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना या अंतर्गत द्राक्षापासून बेदाणा निर्मिती प्रकल्पाचा समावेश करण्यात आलेला आहे व या योजनेस पस्तीस टक्के किंवा जास्तीत जास्त दहा लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे. राज्यात 183 शीतगृह असून सोलापूर जिल्ह्यात 11 शीतगृह आहेत. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण ( शालेय पोषण आहार) योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारात फळे, बिस्कीट, दूध ,चिक्की ,गुळ, शेंगदाणे, बेदाणे, चुरमुरे यांचा समावेश आहे ,परंतु आजपर्यंत बेदाणे दिले जात नव्हते ते आता यापुढे आठवड्यातील एक दिवस विद्यार्थ्यांना निश्चित बेदाणे देण्यात येतील असे मंत्री महोदयांनी सभागृहात सांगितले, तसेच बेदाण्यावरील बँक कर्जाचे व्याज व पाच टक्के जीएसटी चा भुर्दंड बसू नये यासाठी शासन विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा