Breaking

सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२

असुरक्षित कामांमुळे महामार्गावर दरडी कोसळण्याची भीती कायम महाडजवळ असुरक्षित कामामुळे अपघातांचेn प्रमाण वाढलेमहामार्ग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवरच कारवाईची गरज



असुरक्षित कामांमुळे महामार्गावर दरडी कोसळण्याची भीती कायम 

महाडजवळ असुरक्षित कामामुळे अपघातांचेn प्रमाण वाढले
महामार्ग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवरच कारवाईची गरज 

 

महाड – मिलिंद माने


मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली कांही वर्ष रेंगाळत सुरु आहे. या कामाकडे महामार्ग अधिकारी जाणीवपूर्वक लक्ष देत नसल्याने गेली कांही दिवसात महामार्गावर वारंवार अपघात होत आहेत. असुरक्षित काम आणि नियोजनाचा अभाव यामुळे आजही महामार्गावर परशुराम घाट दुर्घटना घडू शकते. महाडजवळ नडगाव आणि केंबुर्ली या दोन गावांजवळ दरडी कोसळण्याची भीती आजही कायम आहे.
मुंबई गोवा महामार्गाचे काम माणगाव ते कशेडी दरम्यान गेली कांही संथ गतीने सुरु आहे. महामार्गावर सुरु असलेल्या कामांबाबत कोणत्याच प्रकारची सुरक्षा बाळगली जात नसल्याने सातत्याने अपघात होत आहेत. नुकतीच परशुराम घाटात खोदकाम करताना दरड कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर रस्त्याचा अंदाज येत नसल्याने ऐन रात्री आणि पहाटेच्या सुमारास वाहनांचे अपघात होत आहेत. महामार्ग चौपदरीकरण ठेका घेतलेल्या कंपन्यांकडून महामार्गावर सुरक्षा फलक लावण्यात आणि पर्यायी मार्ग फलक लावण्यात कुचराई केली जात आहे. पर्यायी मार्ग देखील खाचखळग्यानी व्यापेलेले असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी असलेले मातीचे ढिगारे, कठड्यांची कामे, पसरलेली खडी आदींमुळे महामार्गावर दुचाकी आणि इतर वाहनांना त्रासदायक ठरत आहेत. याबाबत महामार्ग विभागाचे महाड आणि पेन कार्यालयातील अधिकारी याबाबत सूचना करत नसल्याने ठेकेदार आपलीच मनमानी करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
पनवेल ते इंदापूर हा पहिला टप्पा देखील निकृष्ठ दर्जाचा झाल्याने अल्पावधीतच या मार्गाचे वाटोळे झाले. यामुळे पनवेल पासून इंदापूर पर्यंत देखील अनेक ठिकाणी रस्ता असुरक्षित आहे. इंदापूर पासून पुढे कशेडी पर्यंत हा महामार्ग काँक्रीटच्या माध्यमातून केला जात आहे. दासगाव खिंड, इंदापूर ते माणगाव दरम्यान आणि पुढे नांगलवाडी दरम्यान अद्याप महामार्ग अर्धवट अवस्थेत आहे. तर उर्वरित भागात काम सुरु असल्याने ठिकठिकाणी महामार्ग असुरक्षित बनला आहे. परिपूर्ण कामाला आणखी कांही वर्ष लागण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यातच महामार्गाचे काम सुरु असताना परशुराम घाटात दुर्घटना घडल्याने महामार्ग कामाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाड जवळ नडगाव आणि केंबुर्ली या दरम्यान एका बाजूला नदी आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगर अशा कात्रीत महामार्ग अडकल्याने चौपदरीकरण करताना मोठी समस्या निर्माण झाली होती मात्र महामार्ग कामाच्या ठेकेदाराने हे डोंगर फोडून काम पूर्ण करण्याचा सपाटा लावला आहे. या दोन्ही ठिकाणी रस्त्यापासून अवघ्या एक फुटापासून डोंगर असल्याने डोंगर उतारावर कोणतीच सुरक्षा यंत्रणा राबवली गेलेली नाही. यामुळे ऐन पावसाळ्यात उतारावरून येणारे दगड, माती थेट महामार्गावर येण्याची भीती कायम राहिली आहे.  
नडगाव आणि केंबुर्ली गावाजवळ उभा डोंगर खोदून महामार्ग विस्तारीकरण काम करण्यात आले आहे या ठिकाणी ऐन पावसाळ्यात डोंगरावरील दगड महामार्गावर येऊन अपघात होण्याची शक्यता आहे यामुळे ज्या पद्धतीने कोकण रेल्वे मार्गावर जाळी बसवण्यात आले आहे अशा पद्धतीची सुरक्षा व्यवस्था करणे आवश्यक आहे तसे झाले नाही तर वाहनचालकांवर या ठिकाणी डोक्याची टांगती तलवार कायम राहणार आहे
नडगाव आणि केंबुर्ली या दोन ठिकाणी अद्याप तरी कोणत्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था करायची याबाबत निर्णय झालेला नाही मात्र या दोन्ही भागांमध्ये काँक्रिटीकरण किंवा सुरक्षा जाळी वापरण्याचा विचार केला जाईल अमोल महाडकर शाखा अभियंता महामार्ग बांधकाम विभाग महाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा