जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठेवीत मोठी वाढ झाली असून सध्या बँक सुस्थितीत - आमदार संजयमामा शिंदे
कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष शशीभाऊ शिंदे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
AJ 24 Taas News साठी माढा / प्रतिनिधी -राजेंद्र गुंड
-मागील काही वर्षे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक चुकीच्या नियोजनामुळे आर्थिकदृष्टया अडचणीत आली होती परंतु सध्या ठेवींमध्ये मोठी वाढ झाली असून प्रशासकाच्या माध्यमातून बँक सुस्थितीत आली आहे त्यामुळे भविष्यात कर्मचाऱ्यांचे प्रश्न व समस्या टप्प्याटप्प्याने नक्कीच मार्गी लागतील असे प्रतिपादन करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे.
ते कुर्डुवाडी ता.माढा येथे कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष शशीभाऊ शिंदे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार सोहळा व कर्मचारी स्नेह मेळाव्याप्रसंगी रविवारी बोलत होते.
सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्षहार घालून दीपप्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस कामगार विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव खटकाळे होते.
याप्रसंगी सेवानिवृत्तीनिमित्त शशीभाऊ शिंदे व त्यांच्या पत्नी भारतीताई शिंदे यांचा यथोचित सत्कार आमदार संजयमामा शिंदे व जिल्ह्यातील बँकेचे कर्मचारी व सचिव संघटनेच्या वतीने करण्यात आला.
पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले की,शशीभाऊंनी आपल्या 35 वर्षाच्या सेवेत नेहमी बँकेच्या व कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले.कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने यशस्वी पाठपुरावा केला. सध्या राज्यात महाविकासआघाडीचे सरकार असल्यामुळे विकासकामांना गती आली असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी विशेष सहकार्य केले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.सोसायटीच्या सचिवांनी कर्जवसुलीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम केल्यास बँक लवकरच पूर्णतः सुस्थितीत येईल मग त्यांच्या नियमित वेतनाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना करमाळ्याचे विलासराव घुमरे म्हणाले की, संजयमामा शिंदे आमदार होण्यापूर्वी करमाळा तालुक्यातील राजकारण पूर्णतः नकारात्मक होते परंतु आमदार संजयमामांनी विकासकामांच्या माध्यमातून सकारात्मक करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांच्या चांगल्या व विधायक कार्याला आमच्या नेहमीच शुभेच्छा व सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
सत्काराला उत्तर देताना शशिभाऊ शिंदे म्हणाले की,माझ्या सेवेच्या कार्यकाळात जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली साथ मी कधीही विसरू शकणार नाही. जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रेमाने व सत्काराने मी अक्षरशः भारावून गेलो असल्याचे सांगत मध्येच काही काळ ते भाऊक झाले.मी माझ्या पदाचा उपयोग स्वार्थासाठी न करता कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केला आहे.भविष्यातही बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सहकार्य व मार्गदर्शन करण्याची भूमिका राहील असे त्यांनी सांगितले.
प्रस्ताविक कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब सुरवसे यांनी केले.सूत्रसंचालन विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले.आभार राजकुमार सरवदे यांनी मानले.
याप्रसंगी माढा तालुक्याचे सिनिअर बँक इन्स्पेक्टर व्यंकटराव पाटील, संतोष वरपे,सुजित भिसे,संघटनेचे सचिव राजेश गवळी,तात्यासाहेब कोळी,महेश जाधव,सुधीर जाधवर, एम सी दुलंगे,जे डी पाटील,महादेव घाडगे,राजकुमार पवार,आनंद डांगे, दिलीप पवार,रमेश बोगावे,राजेंद्र नलवडे,अजितसिंह देशमुख,मदन मुकणे,अनिलकुमार अनभुले, आण्णासाहेब पाटील,लक्ष्मण चांगभले,मुख्याध्यापक महादेव सुरवसे,सागर करळे,शिवाजी उबाळे, अरुण नाईकवाडे,अण्णासाहेब चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यातील बँक इंस्पेक्टर, शाखाधिकारी,कर्मचारी वृंद,विविध सोसायट्यांचे चेअरमन व सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी -कुर्डुवाडी ता.माढा येथे सेवानिवृत्तीनिमित्त शशीभाऊ शिंदे यांचा सपत्नीक सत्कार करताना आमदार संजयमामा शिंदे व इतर मान्यवर


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा