*अंनिस सुरू केली स्वयंघोषीत मन्यामामाच्या आश्रमाची पाळेमुळे खोदायला*
काल सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजूपर्यंत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी व सोलापूर जिह्यातील सर्व शाखेच्या सदस्यांनी केली मन्यामामाच्या आश्रमाची केली पोलखोल,अनेक धागे दोरे अंनिस हाती लागले.दरम्यान गावकऱ्यांच्या भेटी घेतल्या.त्यातील अनेकजणांनी लेखी तक्रारी समितीकडे दिल्या.इतर जिल्ह्यातून सुध्दा काही तक्रारदार आले होते त्यांनी ही लेखी तक्रारी समितीकडे दिल्या. यावेळी राज्य पदाधिकारी म्हणून निशाताई भोसले,प्रा.डॉ.अशोक कदम हजर होते तसेच सोलापूर जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार अरुण कोरे, प्रा.केदारीनाथ सूरवसे,यशवंत फडतरे,अंजली नानल,लता ढेरे,विनायक माळी व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
बुवाबाजी हा अत्यंत किफायतशीर,बिनभांडवली धंदा आहे.कोणत्याही धंद्याच्या संरक्षणासाठी ज्या वैध-अवैध यंत्रणा उभ्या केल्या जातात,तशाच यंत्रणा बुवाबाजीच्या धंद्यासाठी निष्ठूरपणे राबवतात. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा उंदरगावचा बेकायदेशीर आश्रम होय.आश्रम उभा करताना ना ग्रामपंचायतीची परवानगी,ना लाईट वापरताना विद्युत पारेषणची सगळा थाट आपल्या मर्जीनेच.
खरंतर सर्व पातळ्यांवर,सर्व समाजघटकात,सर्व आर्थिक स्तरात,महिला-पुरुष-युवक यांच्यात पसरत चाललेल्या बुवाबाजीचे स्वरूप चक्रावून टाकणारे आहे.बुवाबाजी करणाऱ्यांचे प्रकारही विस्मयजनक असतात.कोणत्याही व्यवसायात शाखा-उपशाखा याचा पसारा पसरलेला हल्ली आढळून येतो.सदैव बरकतीला आलेला बुवाबाजीचा धंदाही याला अपवाद नाही.बुवाबाजीकडे झेपावणारे जनसमूह हे एक भयचकित करणारे वास्तव आहे.वेगवेगळ्या वयोगटातील,समाजघटकातील,समाजस्तरातील,शहरी,ग्रामीण,स्त्री-पुरुष ज्यावेळी आपापल्या पातळीवर बुवाबाजीच्या मानसिकतेचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थक असतात.
उंदरगावच्या बाबाकडे जाणारी मंडळी भविष्य जाणून घेण्यासाठी आणि ते आपापल्याला अनुकूल घडेल यासाठी बाबांनी आपली दैवी शक्ती वापरावी ही करुणा भाकण्यासाठी जात.आपल्या बाबांनी सांगितलेले अचूक कसे ठरले,याचे रसभरीत वर्णन हीच मंडळी करत.ते अनुभव ऐकणाऱ्यानाही असे वाटू शकते,की बाबांना ज्या अर्थी आधिच हे समजते त्याअर्थी भविष्यातील नशीब ही कल्पना खरी असणार आणि ते भविष्य समजणारे बाबाही ग्रेट असणार.पण जो बाबा,बुवा,महाराज त्याच्या दैवी सामर्थ्याबद्दल प्रसिध्दीस पावतो.त्याच्या कर्तुत्वाने घडलेल्या चमत्काराच्या कथा सतत पसरवल्या जातात.इथेही तसेच झाले बाबाच्या दैवी सामर्थ्याने (नसलेल्या)ज्यांना लाभ झाला असे रुग्ण,दिवाळखोर श्रीमंत यांना आलेल्या प्रत्यक्ष प्रचितीच्या या बाबी तिखटमीठ लावून मोठ्या प्रमाणात सांगितल्या जातात.ही प्रत्यक्ष प्रचिती तपासण्यासाठी गेलो तर लक्षात आले की त्या निव्वळ अफवा आहेत.
प्रत्यक्ष गावकऱ्यांसोबत ज्यावेळी चर्चा झाली असे निदर्शनास आले की मनोरुग्णांना बरे करण्यासाठी भंडाऱ्याचा वापर केला जातो.केन्सरच्या रुग्णांना बरे करण्यसाठी तोच भंडारा पाण्यात मिसळून प्यायला दिला जातो.दुर्धर आजार बरे करण्यसाठीसुध्दा भंडाराच वापरला जातो म्हणे ..मनोरुग्णांना महिना-महिना आश्रमात डांबून व बांधून ठेवले जाते.त्यांना मारहाण केली जाते.रोग निवारण करण्यासाठी लाखो रुपये घेऊन होम-हवन केले जाते.भूत बाधा काढण्यासाठी सुध्दा लाखो रुपये घेतले जातात.भानामती काढणे,करणी करणे व काढणे,बाबाच्या दर्शनाला सुध्दा पैसे मोजावे लागतात म्हणे ..साधे दर्शन तीन हजार ...व्ही आय पी दर्शन पाच हजार रुपये.. शेजारी बसण्यास पंचवीस हजार रुपये या सर्व बाबी हास्यास्पद जरी असल्या तरी याचे प्रत्यक्ष स्वरूप मात्र भयंकर आहे ..याला वेळीच आळा बसला नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
वैफल्यग्रस्त माणसे या बाबाच्या भूलथापाना बळी पडली.बुवाबाजीमुळेआधीच अचिकित्सक असलेले सामाजिक मन आणखी अचिकित्सक बनते ते या ठिकाणी पहावयास मिळाले.राजकीय व सामजिक नेत्रूत्वाने बाबाच्या पायावर घातलेले लोटांगण हे लोकशाहीला अडचणीत आणते याचा प्रत्यक्ष अनुभव आला.परंतु बुवाबाजी या प्रक्रीयेतुन एकूणच ही जी मानसिक गुलामगिरी जन्माला आली आहे भविष्यात तिचे गांभीर्य सर्वाधिक असणार आहे.
बाबाला जो पैसा मिळाला,ती याची बिनभांडवली कमाई आहे.तो याद्वारे सर्व भौतिक सुखे पुरेपूर उपभोगेल.याच कमाईमधील काही भाग समाजातील गरजूंकरिता-जसे शिक्षण,पाणीपुरवठा,देणग्यादेणे,सभामंडप बांधणे या करिता दिला जाईल.या मधूनच अश्या बाबाला लोकमान्यता मिळते.ते राज्यसंस्थेलाही सोईचे वाटते.त्यामुळे त्यांना राज्यमान्यताही मिळते.बाबाचा धंदा चालू राहणे हा त्यांचा मतलबीपणाचा भाग बनतो.स्वाभाविकच ते बुवाबाजीचे संरक्षक कवच बनतात.इथे तसेच झाले आहे का ? ते पाहणे गरजेचे आहे ..
महा. अंनिसच्या कार्यकर्त्यांना इतर जिल्ह्यातून देखील तक्रारीसाठी फोन येत आहेत तर काहीजण स्वतः भेटून तक्रारी द्यायच्या तयारीत आहेत.या सर्वांच्या लेखी तक्रारी घेऊन अंनिस डॉ.हमीद दाभोळकर यांच्या नेतृत्वात सोलापूर पोलिस अधीक्षक ग्रामीण मा.तेजस्विनी सातपुते यांना लवकरच भेटणार आहे..
अंनिस सत्यशोधन समिती व बुवाबाजी चमत्कार विरोधी पथकाच्या वतीने पाळेमुळे खणून काढण्याचे काम अविरतपणे चालू असून नागरिकांनी न घाबरता समोर यावे त्यांना कायद्याचे संरक्षण मिळेल असे आवाहन अंनिस जिल्हा कार्याध्यक्ष विनायक माळी यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा