Breaking

शुक्रवार, २३ जुलै, २०२१

कोरोनाच्या सावटाखाली वडूज परिसरात बेंदूर सण साधेपणाने साजरा


कोरोनाच्या सावटाखाली वडूज परिसरात बेंदूर सण साधेपणाने साजरा

 वडूज प्रतिनिधी / शरद कदम

        वडूज परिसरात या हि वर्षी बेंदूर सणावर कोरोनाचे सावट असल्यामुळे बेंदूर सण साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमामुसार जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी बैल मिरवणुकीवर बंदी घातलेली असून कोणतेही वाद्य वाजवण्यावर बंदी केली आहे. त्यामुळे गावातील लोकांना बेंदूर सणानिमित्त पारंपारीक पूजा करून बेंदूर सण साध्या पणात घरगुती पध्दतीने साजरा केला.
         पूर्वी बैलांच्या साह्याने शेतीची मशागत, पेरणी या कामाबरोबरच मालवाहतूक करण्याकरता बैलजोडीचा वापर करण्यात येत होता. परंतु आता बऱ्यापैकी आधुनिक तंत्रज्ञान व अवजारे वापरून शेती केली जाते. त्यामुळे बैलजोडीची संगोपन करणे ही बाब काळानुसार लोप पावत चालली असून बैलांची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या तर काही हाऊस म्हणून ठेवलेल्या बैल जोड्या गावात पाहायला मिळतात. बेंदूर सण खास करून बैलांच्या केलेल्या कामातून उतराई होण्याचा असून शेतकऱ्यांबरोबरच लहान मुलांनाही या बेंदूर सणाचे खूप आकर्षण असते. या दिवशी वर्षभराचे कष्ट करणाऱ्या बैलाची आदल्या दिवशी स्वच्छता करून हळद लोन्यानी खांद मळणी केली जाते. संध्याकाळी त्यांना बाजरी शिजवून खायला घातली जाते तर दुसऱ्या दिवशी बैलांना स्वच्छ धुऊन त्यांच्या शिंगांना ऑइल पेंट, बैलांच्या अंगाला वेगवेगळ्या पध्दतीचा रंग लावला जातो. त्याचबरोबर शिंगाला बेगड, गळ्यामध्ये विविध प्रकारचे घुंगरांचे चाळ, नवीन कासरे, कंडे, अंगावरती रंगीत झुली व शिंगांना विविध रंगाचे गोंडे बाधून अशा प्रकारे बैलांची सजावट करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य खाऊ घालून त्यांची पूजा केली जाते व ग्रामदैवताला वळसा घालून त्यांना आणले जाते. 
      सध्या कोरोनामुळे कोणत्याही सणाचे महत्त्व राहिले नाही फक्त औपचारिकता म्हणून सण साजरा केला जातो. असे असले तरी आज घरोघरी कुंभारी मातीच्या बैलांची पूजा करण्यात येत आहे. त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य दाखवण्यात येत असतो. मूळाचा सण असल्यामुळे प्रत्येकाच्या दारी आंब्याच्या पानांचे तोरण बांधण्याची प्रथा आजही गावागावात सुरू आहे. पूर्वीपासून चालू असलेल्या रूढी परंपरा ह्या चालू ठेवाव्याच लागत आहेत. असे मत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा