Breaking

बुधवार, २१ एप्रिल, २०२१

खटावला पूर्णवेळ तहसिलदार देता का ? तहसिलदार - मा.आ.डॉ. दिलीपराव येळगावकर*



*खटावला पूर्णवेळ तहसिलदार देता का ? तहसिलदार - मा.आ.डॉ. दिलीपराव येळगावकर*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

        खटाव तालुक्याला पूर्णवेळ तहसिलदार नसल्यामुळे तालुक्यातील जनतेची अनेक कामे अडकून पडली आहेत. महसूल विभागाने खटाव, माण या दोन्ही दुष्काळी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा अंत पाहू नये व खटावला पूर्णवेळ तहसिलदार देता का ? तहसिलदार असे म्हणण्याची वेळ आणू नये. अतिरिक्त पदाचा भार संभाळणारे रावसाहेब आठवड्यातून एखादा दुसरा दिवस आपल्या सोयीनुसार येत आहेत. असा टोला खटावचे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी दिला आहे.
        पत्रकारांशी बोलताना डॉ. येळगावकर म्हणाले की, खटावचे तहसिलदार किरण जमदाडे यांनी ६ महिन्यांपूर्वी तहसिलदार पदाची सुत्रे हाती घेतली. पदभार स्विकारताच त्यांनी काही महिने जेमतेम काम केले. वडूज मुख्यालयापेक्षा औंध परिसरातच त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केले होते. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर ते वैयक्तीक कारणामुळे दिर्घ रजेवर गेले आहेत. त्यांचा चार्ज कोरेगाव तहसिलदर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कोरेगावचे रावसाहेब आठवड्यातून एखादा दुसरा दिवस आपल्या सोयीनुसार वडूज येत आहेत. केवळ तहसिलदारांची सही होत नसल्यामुळे राष्ट्रीय वृध्दापकाळ पेन्शन योजनेच्या जेष्ठ लाभार्थांचे अनुदान सुमारे ३ महिने रखडले आहे. त्याशिवाय इतर ही रेशनींग कार्ड, भोगवटा वर्ग १ , भोगवटा वर्ग २ अशी अनेक प्रकरणे तहसिलदारांच्या स्वाक्षरीसाठी प्रलंबित आहेत. महसूल कोर्टाविषयी मरामभरोसे झाले आहे. कोरोना महामारीमुळे जनतेच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
        मागील वर्षी तत्कालीन तहसिलदार डॉ.अर्चना पाटील दररोज प्रत्यक्ष ग्राऊंडवर जाऊन काम करत होत्या. सध्या तहसिलदार च नसल्यामुळे आरोग्य विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे. वडूज, औंध, कलेढोण येथील ग्रामीण रुग्णालयातील कोरोना कक्ष अद्याप सुरू नाहीत. मायणी येथील धर्मादाय हॉस्पीटलमध्ये कोरोना सेंटर सुरू आहे. मात्र या ठिकाणी रेमडिसिव्हिर व अन्य इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे समजते. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडिसिव्हिर इंजेक्शन बाहेरून आणावी लागत आहेत. तालुक्यातील काही ठिकाणी या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याच्याही तक्रारी आहेत, असे ही डॉ.येळगावकर नमूद केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा