Breaking

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०

*मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर समाज्याच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश आंदोलन..* *मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे राज्यमंत्र्यांनी दिले आश्वासनं*



*मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर समाज्याच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश आंदोलन..*

 *मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे राज्यमंत्र्यांनी दिले आश्वासनं* 

*इंदापूर:-प्रतिनिधी* शिवाजी पवार

 मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी इंदापूर तालुक्यातील सकल मराठा बांधवांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी आक्रोश आंदोलन केले. दत्तात्रय भरणे इंदापूर तालुक्याचे आमदार झाल्यानंतर आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर त्यांच्या थेट निवासस्थानी झालेले हे पहीलेच आंदोलन असल्याने नेमके काय घडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. यावेळी उपस्थित शेकडो मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीने परिसर गजबजून गेला होता. 

यावेळी मराठा समाजाच्या या आक्रोश आंदोलनाला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देत आपला पाठींबा देखील दर्शवला. यावेळी दत्तात्रय भरणे म्हणाले कि मराठा समाजात आर्थिक दृष्ट्या अनेक कुटुंब कमकुवत असल्याने शिक्षण घेण्याची इच्छा असतानाही ते शिक्षण घेऊ शकत नाहीत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी माझा पाठींबा राज्य सरकारचा प्रतिनिधी या नात्याने महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रीयेने न्याय देईल असे आश्वासन मी आपणांला देतो.


भरणे पुढे बोलताना म्हणाले कि देशाचे नेते शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,  सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांसह महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा विषय मार्गी लावण्याकरिता गेले आठ दिवस अशोक चव्हाण आणि या विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर हा विषय अतिशय गांभीर्याने हाताळत आहेत. 

कोर्टापुढे आणि सरकारपुढे हा विषय कशा पद्धतीने मांडला पाहीजे यासाठी त्यांचा व्यवस्थित ड्राप्ट बनवण्याचा प्रयत्न आहे.आरक्षण हा विषय न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने याच्यावर जास्त काही बोलता येणार नाही. मात्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून जे जे काही करता येईल त्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असेल असे अश्वासन देऊन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सकल मराठा समाजास अर्थात अंदोलकांना आपल्या पाठींब्याचे पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा